Nashik Lok Sabha Constituency नाशिक : राज्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघासाठीच्या (Nashik Loksabha) जागेचा तिढा महायुतीत (Mahayuti) अखेर सुटला आहे. नाशिकची जागा आपल्या पदरात पाडण्यात शिवसेनेला अखेर यश आले आहे. आज विद्यमान खासदार शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना (Hemant Godase) नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती, तर त्यात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही या जागेसाठी जोर लावला होता. मात्र, काही केल्या उमेदवाराची घोषणा होत नसल्याने छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या जागेवरील आपला दावा सोडत असल्याचे जाहीर केले होते. अशातच आता या जागेसाठी हेमंत गोडसेंच्या नावावर अखेर आज शिक्कामोर्तब झाल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसेंचे अभिनंदन करत, आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


ही अतिशय आनंददायी बाब 


अपेक्षेप्रमाणे हेमंत गोडसे यांना नाशिकच्या जागेसाठी उमेदवारी अखेर आज जाहीर झाली आहे. ते सध्याचे विद्यमान खासदार असून अपेक्षेप्रमाणे आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. ही अतिशय आनंददायी बाब असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छाही देतो. असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उमेदवारी बाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


पूर्ण ताकतीने प्रचाराचे काम हाती घेणार- छगन भुजबळ


नाशिकमध्ये आजपासूनच आम्ही पूर्ण ताकतीने प्रचार-प्रसाराला सुरुवात करणार आहोत. दिंडोरीच्या उमेदवार भारतीताई पवार आणि  हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम देखील उद्या संपन्न होईल. याकरिता राज्याचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याकरता भव्य मिरवणुकीचे ही आयोजन करण्यात येईल. या मिरवणुकीमध्ये नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघातील महायुतीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहतील.


सध्या घडीला निवडणुकीसाठीच्या प्रचाराला दिवस जरी कमी असले तरी, हेमंत गोडसे हे नाव प्रचलित असून सर्वांच्या ओळखीचे आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी मतदारसंघात बरेच काम केले आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार करणं फार अवघड नसणार आहे. त्यामुळे महायुतीतील आम्ही सर्व पूर्ण ताकतीने त्यांच्या प्रचाराचे काम हाती घेणार असल्याचेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले. 


.... म्हणून काय राजकारण संपलं असं होत नाही


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी नाशिक मतदारसंघातून आमचे खासदार नक्की पाठवू, असा विश्वासही भुजबळ यांनी बोलताना व्यक्त केलाय. नाशिक मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होत होती. मात्र आता  गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भुजबळ समर्थकांचा हिरमोड झाल्याचे बघायला मिळत आहे. याबाबत भुजबळ यांनाच विचारले असता ते म्हणाले की, राज्यात ओबीसी समाज असेल, समता परिषद तसेच अनेक वंचित, दिन-दलित, कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांना आपल्यावरील प्रेमापोटी ही भावना येतं असते. ती अगदी क्रमप्राप्त देखील आहे. मात्र महायुतीचा भाग असताना काही ठिकाणी आपल्या अपेक्षा बाजूला ठेवून पक्षश्रेष्ठींचा निर्णय मानावा लागतो.


तर काही ठिकाणी तडजोडही करावी लागते. असे असले तरी एक उमेदवारी मिळाली नाही म्हणून काय राजकारण संपलं असं होत नसल्याचेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले. संधी येतात, संधी जातात. मात्र, आपलं काम निरंतर सुरू ठेवलं पाहिजे. त्यामुळे माझे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने या प्रचाराच्या कामाला लागतील, असा विश्वासही भुजबळ यांनी बोलताना व्यक्त केलाय.


इतर महत्वाच्या बातम्या