Narayan Rane on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलेल्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. यावरून भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे आधी दोन्ही हातवर करून बोलत असायचे. मात्र आता ते हात एकदम छोटे झाले. त्यामुळे उद्या स्वबळावर लढून काय होणार? स्वबळाची ताकद त्यांची राहिली नाही. 46 वर्षात साहेबांनी जे मिळवलं ते अडीच वर्षात यांनी गमावलं, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो मान्य
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाची भाजपशी जवळीक वाढताना दिसत आहे. याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, माहित नाही, मला बरं वाटतंय, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. तो जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील, असे त्यांनी म्हटले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती स्वबळावर लढणार का? असे विचारले असता मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे आता काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.
संजय राऊत डिप्रेशनमध्ये
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रत्यत्न करताय. माफियांना सुरक्षा देण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका, असे त्यांनी सांगितले.
कोणती तीर्थयात्रा केली म्हणून जेलचा पुरस्कार मिळाला होता?
संजय राऊत यांनी भाजप माफियांना पोसत असल्याचा आरोप केला. याबाबत नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोसत होते? कोणकोणत्या माफियांना संजय राऊत भेटत होते? कोणती तीर्थयात्रा केली म्हणून त्यांना जेलचा पुरस्कार मिळाला होता? हे त्यांना आधी सांगावं. शिवसेनेत बोलायला माणूस नसल्यामुळे त्यांना कामधंदा नसल्याने ते असे बोलतात, असे प्रत्युत्तर त्यांनी यावेळी संजय राऊत यांना दिले.
शिंदे कधीच नाराज होऊ शकत नाही
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा रंगली. याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळात खूप चांगलं काम केलं आहे. यावेळी भाजपचे आमदार जास्त निवडून आले. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे शिंदे कधीच नाराज होऊ शकत नाही, ते सुद्धा एक राजकारणी आहेत, असे नारायण राणे यांनी म्हटले.
आणखी वाचा