Praniti Shinde Solapur Lok Sabha : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद आणखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत परंपरागत विरोधक असलेल्या नेत्याने थेट पाठिंबाच जाहीर केलाय. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. पण वंचित आणि एमआयएम यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघाचं गणित बदलणार होतं. वचिंत आणि एमआयएमचा फटका प्रणिती शिंदे यांनाच बसण्याची शक्यता आहे. पण आता माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदेना पाठिंबा जाहीर केला. आडम मास्तर यांच्या पाठिंब्यामुळे प्रणिती शिंदे यांची ताकद नक्कीच वाढणार आहे.

  


दरम्यान पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांची माकप कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीतचं नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदेना पाठिंबा देण्याचे आश्वासन देत कामगार आपल्या मागे राहतील असा शब्द दिला. "गेल्या 10 वर्षात याला योग्य गती नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही, राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव आहे." असे म्हणत राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला माकपनं पाठिंबा जाहीर केला. दरम्यान सोलापूर शहर मध्यची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या प्रमुख नेत्यांची चर्चा केली आहे. त्यानुसार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले आहे,  जर पक्षश्रेष्ठींकडून असा निर्णय झाला तर मला कोणतीही हरकत नाही असा शब्द सुशीलकुमार शिंदेनी दिल्याचे आडम यांनी सांगितलं. 


कट्टर विरोधाक मदतीला धावला 


कॉम्रेड नरसय्या आडम हे प्रणिती शिंदेंचे कट्टर विरोधक मानले जातात. आडम मास्तर सोलापूर शहरातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. 1978, 1995, 2004 च्या निवडणुकीत नरसय्या आडम यांनी विजय मिळवलेला होता. कामगारांचा नेता अशी ओळख असलेला नरसय्या आडम मास्तर यांचा 2009 च्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी पराभव केला.  जाई जुई विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रदार्पण करणाऱ्या प्रणिती शिंदे यांनी 2009 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री केली. त्यानंतर झालेल्या 2014 आणि 19 च्या निवडणुकीत देखील प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांना धूळ चारली. त्यामुळे प्रणिती शिंदे आणि नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. राष्ट्रीय पातळीवर जरी माकपणे अनेक वेळा काँग्रेस पुरस्कृत आघाडीला पाठिंबा दिला असला तरी सोलापुरात मात्र नेहमी चित्र वेगळे असायचे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नरसय्या आडम काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नरसय्या आडम यांनी आता काँग्रेसची साथ द्यायचा निर्णय घेतल्याने प्रणिती शिंदे यांची ताकद वाढली आहे.विधानसभा निवडणुका मागील अनेक वर्ष एकमेकांचे विरोधक राहिलेले प्रणिती शिंदे आणि नरसाई आडम आगामी लोकसभा निवडणुकीत एकमेकांची साथ देतील.