Nanded: नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसने ठराव एकमताने पारीत केला आहे.  जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला होता. यावर सर्वांचे एकमत झाले. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार ठरला असून त्यावर पक्षाकडून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.


खासदार वसंत चव्हाणयांचा 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपमध्ये उमेदवारीसाठी काही नावे समोर येत असताना काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिवंगत वसंत चव्हाण यांच्या मुलाला रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा ठराव मांडलाय.


रविंद्र चव्हाणांच्या नावाची शिफारस


खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता दाट झाली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवडणुकीतील प्रचार व इतर सर्व बाबींचा नियोजनात रवींद्र चव्हाण  यांचा मोठा वाटा होता.


मधल्या काळात त्यांनी काँग्रेसकडे विधानसभेसाठीही अर्ज केला होता. परंतु वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनानंतर पक्षातर्फेच रवींद्र चव्हाण यांनी पोट निवडणूक लढवावी अशी भूमिका घेण्यात आली आहे. यासाठी एकमताने ठराव मंजूर झाला असून हटराव प्रदेश काँग्रेस कडे केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. जेष्ठ नेते ईश्वरराव भोसीकर यांनीही या बैठकीत रवींद्र चव्हाण हेच पक्षाच्या उमेदवारीचे हक्कदार ठरतात, असे नमूद केले.


भाजपच्या उमेदवारास धुळ चारत वसंतरावांचा विजय


लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारुन नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या अजस्त्र ताकदीला धक्का देत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वसंत चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यांच्यावर हैदराबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या अचानक जाण्याने काँग्रेसला वसंत चव्हाणांची गादी त्यांच्या चिरंजीवाने चालवावी असे वाटत असून लोकसभा पोटनिवडणूकीत रविंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीसह जिल्हा काँग्रेसकडून तसा ठराव संमत करण्यात आला आहे.