पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह यांच्यासमोर मांडल्याची माहिती समोर आली होती. 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले होते. अमित शाह आणि अजित पवार यांची सोमवारी मुंबई विमानतळावर भेट झाली होती. यावेळी झालेल्या छोटेखानी बैठकीत अजित पवारांनी (Ajit Pawar) आपली मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर मांडल्याची चर्चा होती. परंतु, अजित पवार यांनी मंगळवारी पुण्या प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावले.


'द हिंदू' दैनिकात मी अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याची जी बातमी छापून आली आहे, ती धादांत खोटी आहे. राज्यातील 25 विधानसभा मतदरासंघांमध्ये महायुतीतील घटकपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. महायुतीतील पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार या सगळ्या थापा आहेत. आम्ही सगळे एकत्र बसून विधानसभेच्या 288 जागांचं वाटप करु. बहुतांश जागांचे वाटप झालेले आहे आणि उर्वरित जागावाटपाचा फैसलाही लवकरच होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 


अजित पवार यांना महायुती विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढायला सांगणार, या चर्चेविषयी अजितदादांना विचारण्यात आले. त्यावर अजित पवार म्हणाले की, जे लोक ही चर्चा करत आहेत, त्यांनाच याबद्दल विचारा. मी इतरांनी केलेल्या वक्तव्यावर बोलणार नाही. सध्या आमचं लक्ष्य एकच आहे ते म्हणजे, महायुतीच्या सर्व घटकपक्षांना फायदा मिळवून देणे. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांना सरकारी योजना आणि कार्यक्रमाबद्दल सांगतोय. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची आहे. सगळे घटकपक्ष आपापल्या परीने त्याचा प्रचार करत आहेत. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीमधील सर्व घटकपक्षांना मिळाला पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले.


वर्षा बंगल्यावरच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंनी तुमचा फोटो का लावला नाही? अजित पवार म्हणाले...


काही दिवसांपूर्वी अजितदादा गटाकडून सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणारा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओत लाडकी बहीण योजनेच्या नावापूर्वीचा मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आला होता. अजितदादांची लाडकी बहीण योजना, असा प्रचार जाहिरातीमधून करण्यात आला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर अमित शाह यांच्या स्वागतासाठी जे बॅनर्स लावले होते, त्या बॅनरवरुन अजित पवारांचा फोटो गायब होता. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मिश्कीलपणे म्हटले की, मीच एकनाथ शिंदेंना सांगितलं होतं की, माझा फोटो लावू नका. सध्या सगळीकडे माझे फारच फोटो दिसत आहेत. त्यामुळे मीच त्यांना माझा फोटो लावू नका, असे सांगितल्याचे अजित पवार यांनी म्हटले.



आणखी वाचा


बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या; मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीत अजितदादांचा अमित शाहांसमोर प्रस्ताव?