Nana Patole : "मी एक राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबाबतचा निर्णय हायकमांड घेते. मला पक्ष संघटनेची जबाबदारी मिळाली आहे. ती पूर्ण करुन काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात विजय मिळवून देणे हे माझे काम आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी नेता म्हणून काम करत नाही. त्यामुळे हायकमांड जे निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. पक्षाला मोठं करणं ही माझी जबाबदारी आहे", असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेला भाजपने फोडलं
नाना पटोले म्हणाले, देशाच्या राजकारणात काँग्रेसचे आगळेवेगळे महत्व होते आणि राहणार आहे. हे कोणाला लपवता येणार नाही. भाजपला राज्यपातळीवर नेत्यांना संपवायचं आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या शिवसेनेला त्यांनी फोडलं. पवार साहेबांनी तयार केलेल्या राष्ट्रवादीलाही त्यांनी फोडलं. त्यावेळी आम्ही भूमिका घेतली यांना सोबतच घ्यायचे. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त जागा मिळवून घेतल्या, असा दावाही पटोले यांनी केला.
खरा विजय राहुल गांधींच्या परिश्रमामुळे आणि इच्छाशक्तीमुळे
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, लोकसभेत मिळालेल्या यशाचा आनंद आहे. माझ्यापेक्षा महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना जास्त आनंद आहे. खरा विजय राहुल गांधींच्या परिश्रमामुळे आणि इच्छाशक्तीमुळे आहे. त्यांनी भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रा केल्या. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. राहुल गांधींनी भितीचं वातावरण दूर केलं. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्याच्याच परिणाम आहे की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वांत जास्त जागा मिळाल्या. मी जीवनात ज्या गोष्टी प्राप्त केल्या त्या संघर्षाने केल्या आहेत. माझी खुर्चीची लढाई नाही, जनतेची लढाई आहे. जनतेच्या न्यायाची लढाई आहे. माझा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे नेणे आणि त्या ताकदीचा महाराष्ट्र तयार करायचा आहे, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केली. अशोक चव्हाण सोडून गेले , तेव्हा माझ्यासमोर संघर्ष होता. राहुल गांधींनी मला प्रेरणा दिली. त्यांनी सांगितलं की, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ज्याला सोडून जायचंय त्याला सोडून जाऊद्यात. राहुल गांधींचे ते वाक्य माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. मी त्याच ताकदीने नांदेडमध्ये लक्ष घातलं. यावेळेस तिथे आम्ही जिंकलो. ते एकच नाहीतर आम्ही 3 जागा मराठवाड्यात जिंकल्या, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
''...तर पालकमंत्री संदीपान भुमरेंना जिवेच मारू, तुमचा शरद मोहोळ अन् गजू तौर करू''; संभाजीनगरमध्ये 'गब्बर'च्या पत्राने खळबळ, पोलिस अधिकारी फैलावर