मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लका राहिले असून दिवाळीनंतर निवडणुकांचे (Election) बुगल वाजणार आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून दौरे, गावभेटी आणि सभांच्या माध्यमातून जनतेसमोर येत आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करताना पाहायला मिळतात. त्यातच, आज नाशिकमधील सभेतून त्यांनी थेट 288 जागांवर उमेदवार देण्याची घोषणाच केली आहे. आता, भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विधानसभा निवडणुकांसदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
निवडणुका महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून नांदेड जिल्ह्यात आमचं मोठं नेटवर्क आहे. सर्वांना जबाबदारी निश्चित करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बैठका होत असून मी सहभागी होत आहे, त्यासाठीच मी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहे. सर्व लोक काम करत आहेत, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मी इथे आलो असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी लोकसभेची परिस्थिती वेगळी होती, तीच परिस्थिती विधानसभेला राहिल अशी परिस्थिती नाही. लॉटरी एकदाच लागत असते, नेहमी नाही, असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तर, पुन्हा लॉटरी लागेल अशी अपेक्षा नानांना आहे, ती चुकीची आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं आहे. केंद्राचा मोठा हातभार राज्याला लाभणार आहे, लोक याचा विचार करतील. त्यामुळे, लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी संभाजीनगरमध्ये बोलताना म्हटले.
नाना पटोलेंवर निशाणा
काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळेस मी प्रामाणिकपणे काम केलं. मला नाना पटोले यांना आठवण करून द्यायचं आहे. नाना पटोले भाजप सोडून गेले तो दिवस काय समजायचा, त्यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. नाना पटोले यांच्याकडून आरोप होत आहे की, निवडणुका तुम्हीच पुढे ढकलत आहात, या प्रश्नावरही अशोक चव्हाणांनी नानांवर जोरदार पलटवार केला. नानाला कायदा प्रक्रियेचं ज्ञानच नाही, काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष अशी भाषा वापरतो ही केवीलवाणी गोष्ट आहे. वाचायची सवयच नसल्यामुळे असं होतं. निवडणुकांच्या तारखा घोषित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे, राजकीय पक्षांनी यावर हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले.
हेही वाचा
आधी म्हैस, आता महागडी कार, गाडीचा नंबरही जोरदार;'गोल्ड'न बॉय अरशदला मरियम नवाज यांचं स्पेशल गिफ्ट