पॅरीस ऑलिंपिक विजेता अरशद नदीमचं (Arshad Nadeem) मायदेशी पाकिस्तानमध्ये जंगी स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. सासऱ्याकडून अरशदला चक्क म्हैस गिफ्ट करण्यात आल्यानंतर सोशल मीडियातून याची खिल्ली उडवण्यात आली. मात्र, आता अरशदला अनेक महागडे गिफ्ट मिळत आहेत. पाकिस्तानच्या पंजाबच्या प्रांतातील मुख्यमंत्री मरयम नवाज यांनी अर्शदला महागडी कार गिफ्ट केली आहे. विशेष म्हणजे या कारचा नंबरही खास आहे. अरशद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympics 2024) सुवर्णपदक जिंकले. अर्शदने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. भारताच्या नीरज चोप्राला हरवून त्याने सुवर्णपदक (Gold) जिंकले. आता, सुवर्णपदक जिंकून पाकिस्तानात परतल्यावर अर्शदवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. 


सुवर्णपद जिंकल्यानंतर अरशद नदीमला 50 हजार डॉलर (सुमारे 41,97,552 भारतीय रुपये) बक्षीस म्हणून मिळाले. त्यानंतर, सासरच्या मंडळींकडून खास म्हैस भेट दिली जाणार आहे. अर्शदचे सासरे मुहम्मद नवाज यांनी स्थानिक मीडियाशी बोलताना स्वतः अर्शदला एक म्हैस भेट देणार असल्याचे सांगितले. अरशदच्या गावात म्हैस भेट म्हणून देणे खूप मौल्यवान आणि आदरणीय मानले जाते. आता, अरशदवर बक्षिसांचा वर्षाव होत असून अर्शदने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुख्यमंत्री मरयम नवाज यांची भेट घेतली. या भेटीत मरयम नवाज यांनी अरशदला खास गिफ्ट देऊ केली आहे. विशेष म्हणजे अर्शदला 10 कोटी रुपये देण्याची घोषणाही मरयम नवाज यांनी केली होती. आता, होंडा सिविक कंपनीची कार गिफ्ट देण्याची घोषणा केली. या कारची किंमत भारतीय किंमतीनुसार 18 ते 28 लाख रुपयांपर्यंत आहे. मात्र, पाकिस्तानमधील चलनानुसार या कारची किंमत 86 लाख रुपये एवढी आहे. 


मरयम यांनी अरशदचे स्वागत करुन त्याला कारची चावी दिली आहे, विशेष म्हणेज अरशदला देऊ केलेल्या कारचाही नंबर खास आहे. या गाडीचा नंबर इतर गाड्यांप्रमाणे असणार नाही. या कारचा नंबर स्पेशल असणार आहे. अरशदने पॅरीस ऑलिंपिकमध्ये जेवढ्या ताकदीने भाला फेकला, त्याचा भाला ज्या अंतरावर जाऊन पडला आणि त्याने गोल्ड जिंकले. अरशदने 92.97 मीटर लांब भाला फेकला होता. त्यामुळे, मरयम यांच्याकडून अर्शदला देण्यात येणाऱ्या कारचा नंबरही 'PAK-9297' असा खास नंबर असणार आहे. 


अरशद नदीमचा ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड अन् सुवर्णपदक-


अरशद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. अरशद नदीमने 92.97 मीटर फेक केली होती. त्याच्या या थ्रोची ऑलिम्पिक रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक पटकावले.