मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना (Mukhyamantri Tirth Darshan Yojana) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत (Vidhan Sabha) केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले.
यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, आता या सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या सरकारला आपली जागा दाखवली आहे. काल बजेट सादर केलं, घोषणा केल्या पण पैसे कुठून आणणार? याचे उत्तर सरकारकडे नाही. घोषणांचे पालन पूर्णपणे शून्य आहे. सरकार आता खोटं बोलून नेरेटिव्ह सेट करत आहे.
मुख्यमंत्री तीर्थयात्रा म्हणजे बोलाचाच भात अन् बोलाची कढी
वारकरी पंथाची लोक येऊन गेली. वारकरी प्रथेला सुविधा देण्याऐवजी या प्रथेला तोडता कसे येईल, याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. निरर्थक गवगवा सरकार करत आहे. शेतकऱ्यांचा कर्ज माफ केलं नाही. मुख्यमंत्री तीर्थयात्रा म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाची कढी, असं सगळं झालंय. या सरकारचे वास्तविक दर्शन आम्ही मांडणार आहोत, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.
पूजा चव्हाण प्रकरणावर काय म्हणाले नाना पटोले?
दरम्यान, नाना पटोले यांनी पूजा चव्हाण प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट मागितले आहे. याबाबत त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्याचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे जे प्रकरण झाले होते. त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते. त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आता फडणवीस हे गृहमंत्री आहेत. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला नाही तरी फडणवीसांनी क्लीन चिट दिली. डाऊटफुल मंत्री जर सरकारमध्ये असेल आणि सरकार चूप असेल तर सरकार सहभागी आहे का? आम्हाला सीडीआर हवा आहे. आम्हाला रिपोर्ट पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
अर्थसंकल्पावर शरद पवारांचा राज्य सरकारला एकच प्रश्न, 70 रुपयांचे उदाहरण देत रोखठोक प्रतिक्रिया!
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल