मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरु आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानपरिषदेचं कामकाज सुरु होताच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शेकापचे जयंत पाटील, (Jayant Patil) काँग्रेसचे भाई जगताप, (Bhai Jagtap) अभिजित वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक (Vidhan Parishad Speaker Election) कधी लावणार हा मुद्दा उपस्थित केला.  यावर उपसभापती नीलमताई गोऱ्हे (Neelamtai Gorhe) यांनी सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत हे विषय मांडू असं म्हटलं.


शेकापचे नेते जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या सभापती पदाचा मुद्दा उपस्थित केला. सभागृह संविधानाप्रमाणं चाललं पाहिजे. सभापतीची निवडणूक लावण्याबाबत ठराव मांडणार आहे, यावर आपल्याला चर्चा करावी लागेल, असं जयंत पाटील म्हणाले. गेली अनेक वर्षे सभापतीपद रिक्त आहे. एका मर्यादेपर्यंत तुम्ही उपसभापती असूनही सभापतीपदाचा चार्ज ठेवू शकता, असं जयंत पाटील म्हणाले. विधानमंडळाच्या सचिवांचं काम राज्यपालांना सभापतीपद रिक्त असल्याचं कळवणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. 


भाई जगताप यांनी सभापती पदाचा विषय हा महत्त्वाचा आहे. हे पद इतकी वर्ष रिकामं असताना आपल्या सचिवालयानं राज्यपालांना कळवलं का याचं उत्तर तात्काळ हवं. आपल्या कर्तव्याबद्दल याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. परंतु, अडीच वर्ष जे काम झालं ते अवैध आहे का? असा सवाल भाई जगताप म्हणाले.  मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात निवडणूक लावणार असल्याचं सांगितलं होतं काय झालं असा सवाल भाई जगताप यांनी केला. कामकाज संपण्यापूर्वी निवडणूक कधी घेणार याची माहिती द्या, असं भाई जगताप यांनी म्हटलं. 


शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक जाहीर करतो असं सांगितलं होतं त्याला सहा सात महिने झाले आहेत. किती दिवस हे पद रिक्त ठेवणार असं शशिकांत शिंदे म्हणाले.  काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी देखील सभापती निवडणुकीबाबत प्रश्न उपस्थित केलं. 


एकमतानं सभापती निवडू : अंबादास दानवे


विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेचा सभापती एकमताने निवडायला आम्ही तयार आहोत, असं म्हटलं.  बहुमताचा विषय नाही पण  सगळ्यांची भावना आहे.  सभापतीची पण निवडणूक लवकरात लवकर व्हावी ही विनंती आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.


उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी  विरोधकांनी एकदम अचानक ही लक्षवेधी लावलेली आहे असं म्हटलं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. या लक्षवेधीची तयारी ते करून आले नव्हते. राज्यपालांना याबाबत कळवण्यात आलेलं  आहे.  सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत हा विषय काढू असं नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या. 


संबंधित बातम्या : 



चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने! विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, सताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी