Nagpur Winter Session : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा सभागृहात विदर्भाच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान तुफान टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या टिप्पणीवर फडणवीसांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं. "दादा म्हणाले की अमृताशी बोला (Amruta Fadnavis), पण दादा तुम्ही हे बोलताना सुनेत्राताईंना विचारल होतं का?" असं म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. 


तसंच विरोधी पक्षनेत्यांचं भाषण मी अनेकदा ऐकलं आहे. मात्र यावेळीचं भाषण जयंतरावांनी लिहून दिल्यासारखं वाटलं. जयंतराव बाहेर आहेत त्यामुळे त्यांचं भाषण पाहायला मिळालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


शरद पवारांमुळे अजितदादा मुख्यमंत्री झाले नाहीत


दादांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. कोण मुख्यमंत्री झाले, किती झाले वगैरे.. पण दादा एका गोष्टीचे दु:ख आहे, तुम्हाला मुख्यमंत्री बनायची संधी असतानाही पवारसाहेबांनी (Sharad Pawar) तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही. 2004 मध्ये तुमच्या कराराप्रमाणे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं असताना, शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


मी आकडे विसरत नाही : देवेंद्र फडणवीस


अजित पवार अर्थमंत्री असतानाचा उल्लेख करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "दादा तुम्ही ही अर्थमंत्री होता. तुम्ही पुरवण्या मागण्या मांडल्या. त्या 16 टक्के होत्या, आम्ही 14 टक्केच मांडल्या आहेत. केंद्राचा निधी येणार आहे त्यासाठी ही काही तरतूद केली आहे. ठोक तरतुदीचे जनक हे दिलीप वळसे-पाटील आहेत. त्यावेळी 35 हजार कोटींची ठोक तरतूद ठेवली होती. मी आकडे विसरत नाही." 


दादा, मला ट्विटरवर फॉलो करा


दादांना शेतकऱ्यांच्या वीज तोडण्याच्या जीआर कसा मिळाला नाही? मी ट्वीट केला, फेसबुकवर टाकला, सर्वांना पाठवलाही, त्यामुळे दादा आता तुम्ही मला ट्विटरवर फॉलो करा, अशी कोपरखळी देवेंद्र फडणवीस यांनी लगावली. ते विरोधी पक्षनेते म्हणून मला फॉलो करतात आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना फॉलो करतो, असंही फडणवीस म्हणाले. 


दादा, बंद पडलेल्या बँका तुमच्या हातात होत्या : फडणवीस


विदर्भात बँका बंद पडल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, दादा बँका बंद पडल्याचा आरोप तुम्ही करता. पण बंद पडलेल्या बँका तुमच्या हातात होत्या. या बॅंकांमध्ये खूप घोटाळे झाले. या बॅंकाना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आत्महत्यांचं हे एक कारण आहे. कोणत्याही बॅंका जर शेतकऱ्यांच्या सिबीलचा मुद्दा उपस्थित करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.


VIDEO : Devendra Fadnavis On Ajit Pawar : पण दादा हे बोलताना तुम्ही सुनेत्राताईंना विचारलं होतं का?