Ajit Pawar on TET Scam : 'टीईटी' घोटाळ्यासंदर्भात (TET Scam) सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (21 डिसेंबर) सभागृहात संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करुन त्याची माहिती सभागृहात देण्यात येईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिली. त्यानंतर हा प्रश्न उत्तरासाठी आणि निवेदनासाठी राखून ठेवण्यात आला. 


'घोटाळ्यात मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची मुले असल्याने कारवाईला उशीर'


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीईटी घोटाळ्या संबंधी तारांकित प्रश्न सूचना क्र.50491 दाखल केली होती. दाखल केलेला प्रश्न सात भागांचा होता. मात्र प्रश्नोत्तराच्या यादीत मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांशी संबंधित दोन भाग विधानमंडळ सचिवालयाने जाणीवपूर्वक वगळले. या टीईटी घोटाळ्यामुळे मेरीटच्या अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम 70 मध्ये एखादा प्रश्न स्वीकृत व्हावा यासाठी त्याने एकूण 18 शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत. माझ्या प्रश्न सूचनेतील वगळलेला प्रश्न भाग 18 शर्तीमधील नेमक्या कोणत्या शर्ती पूर्ण करत नाहीत, हे मला कळले पाहिजे. तारांकित प्रश्न सूचनेतील वगळलेला भाग विद्यमान मंत्री तसंच सत्ताधारी आमदारांची मुले आणि नातेवाईकांचा समावेश आहे. संबंधित शिक्षकांवर 60 दिवसात सुनावणी घेऊन कारवाई करा, असे आदेश असतानाही केवळ काही मंत्री महोदयांची, काही आमदार महोदयांची आणि काही अधिकाऱ्यांची मुले या घोटाळ्यात असल्याने कारवाईला उशीर होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. 


प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यामुळे चर्चा करु शकत नाही, पण आमच्या विभागाकडून सहकार्य : दीपक केसरकर


अजित पवार यांच्या या मुद्द्यांवर, आरोपांवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "एकूण 7500 लोकांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. 293 उमेदवारांना बनावट प्रमाणपत्र पाठवण्यात आली होती. त्यांनाही अपात्र केलं आहे. गुणांमध्ये फेरफार केलेले 21 जण होते त्यांना सुद्धा अपात्र घोषित करण्यात आलं आहे. हायकोर्टात केस केलेली होती त्यावेळी देखील त्यांना ऐकण्याची संधी दिली नाही, या मुद्द्याखाली स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळे यावर चर्चा करु शकत नाही. परंतु यातील बहुतांश लोकांना नोटीस बजावून तपास सुरु आहे. कोर्टाने पोलीस तपासाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. आमचा विभाग संपूर्ण सहकार्य करत आहे."


VIDEO : Ajit Pawar - Deepak Kesarkar on TET Scam : टीईटीचा मुद्दा, केसरकरांनी दिलं सविस्तर उत्तर