Ajit Pawar on Coronavirus : "चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) करावा लागला. या पार्श्वभूमीवर राज्यात काय खबरदारी, उपाययोजना केली जात आहे? जगभरात काय केलं जात आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहात का?" असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात विचारला. नागपुरात सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Nagpur Winter Session) आज तिसरा दिवस आहे.


'चीनमधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमणार का?'


अजित पवार म्हणाले की, "कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात दुबईतून आलेल्या जोडप्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला. चीन, जपान, कोरिया, ब्राझिल या देशात कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडत आहे आणि कोविडची साथ पुन्हा सुरु झाली. चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. बेड शिल्लक नाहीत म्हणून तिथे कारमध्ये रुग्नांना अॅडमिट करण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य सचिवांनी काल नव्या व्हेरियंटविषयी तपास आणि काळजी घेण्याचं आवाहन सर्व राज्यांना केलं आहे. त्यात आपलंही राज्य असेल. तर या सर्व गोष्टींचा विचार करता चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हायपॉवर कमिटी किंवा टास्कफोर्स आणि जगभरात काय केलं जात आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहे का?" 


'नव्या व्हेरियंटचा प्रसार होऊ नये याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी'


नवीन व्हेरियंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाकी कोणती यंत्रणा तात्काळ उभी करायची याचा अनुभव त्यावेळच्या प्रशासनाला आहे. आपण त्याकाळी सहकार्याची भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कोरोनाची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली होती. आपण जम्बो सेंटरची उभारणी केली होती. हा तातडीचा विषय वाटत आहे. याचा विसर कोणत्याही सदस्याला होऊ नये. सरकारने याबाबत काळजी घ्यावी, असा सल्लाही अजित पवार यांनी दिली. 


लवकरच समिती किंवा टास्क फोर्स तयार केला जाईल : देवेंद्र फडणवीस उत्तर


दरम्यान अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी लवकरच एखादी समिती किंवा टास्क फोर्स तयार करण्यात येईल जो अपल्याला जगभरातील बाबींचे अपडेट देत राहिल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.


चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर


कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने  (Covid-19) डोकं वर काढलं आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. चीनमधील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून रुग्णालयात खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. चीनमधील बीजिंग, शांघाय, वुहान, ग्वांगझाऊ, झेंगझोऊ, चोंगकिंग आणि चेंगडू या शहरांमध्ये परिस्थिती अधिक भयावह होत आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता चीनमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा लाखांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.