Nagpur News : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता अबू आझमी (Abu Azmi) आणि असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांची बैठक घेऊन त्यांच्यासोबतही युती करु शकतात," अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली आहे. आमचे सरकार मजबूत आहे. अजूनही 20 ते 25 आमदारांचं छुपं समर्थन आम्हाला आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये, असंही बावनकुळे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या नव्या राजकीय आघाडीची चर्चा रंगत आहेत. त्यातच मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही भविष्यातील राजकीय मैत्रीचे संकेत दिले. त्याबाबत नागपुरात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.


'संजय राऊतांनी आमची काळजी करु नये, अजूनही 20-25 आमदारांचं आम्हाला छुपं समर्थन'
शिंदे-फडणवीस सरकार दोन महिन्यात पडेल, खासदार संजय राऊत यांच्या या दाव्यालाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, आमचं सरकार पूर्ण वेळ चालणार. सरकार मजबूत असून आमची आताची 164 आमदारांची संख्या पुढे 184 पर्यंत जाईल. संजय राऊत यांनी काळजी करण्याची गरज नाही. अजूनही 20-25 आमदारांचा छुपं समर्थन आम्हाला आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये." "संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना रेडे म्हणणं योग्य नाही. ज्या दिवशी तुम्ही त्यांना धनुष्यबाण दिले होते त्या दिवशी ते माणूस होते, शिवसैनिक होते, निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र आता ते तुमच्या हुकूमशाहीमुळे उद्ध्वस्त झाले, आता तुम्ही त्यांना रेडे म्हणत आहात. त्यांना लाखो लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांना रेडे म्हणणं लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेचा अपमान आहे. आता संजय राऊत यांनी अशी भाषा सोडावी आणि पक्ष सांभाळावा. त्यांचा पक्ष रोज फुटतो आहे," असंही बावनकुळे म्हणाले.


'शिवरायांच्या प्रतिमेला धक्का बसेल असं कृत्य राज्यापालांनी केलं नाही, करुही शकत नाहीत'
भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "राज्यपालांच्या वक्तव्यामुळे छत्रपतींची प्रतिमा किंचितही मलिन झाली असेल तर त्यांच्या वक्तव्याला समर्थन करण्याचं कारण नाही. मात्र, राज्यपाल ज्या दिवशीपासून महाराष्ट्रात आले ते छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्यावर गेले, छत्रपती शिवरायांबद्दलच्या वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांनी संवेदनशीलपणे काम केलं. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला धक्का बसेल अशी कोणतंही कृत्य त्यांनी केलेलं नाही आणि ते करुही शकत नाहीत." "शिवरायांचं देशाच्या इतिहासातलं महत्त्व कोणीही कमी करु शकत नाहीत," असं बावनकुळे म्हणाले. "शरद पवार आणि नितीन गडकरी यांचा गौरव करणं ठीक आहे. मात्र छत्रपतींबद्दल राज्यपाल बोलल्याने जो आकांडतांडव झाला, त्याबद्दल आम्ही कालच भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सर्व छत्रपतींच्या विचारांवरच काम करत आहोत," असं बावनकुळे म्हणाले.