Bawankule on Governor : "राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन अनेक वर्षे महाराष्ट्रात काम केलं. त्या दिवशी त्यांची चूक झाली. त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. नागपुरात (Nagpur) ते माध्यमांशी बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वातावरण तापलं आहे. त्यावर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका पुन्हा एका स्पष्ट केली.


आमची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही : बावनकुळे
किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे. परंतु खासदार उदयनराजे यांनी राज्यपालांविरुद्धच्या नाराजीमुळे या सोहळ्याला जाणं टाळलं. याविषयी विचारलं असता बावनकुळे म्हणाले की, "उदयनराजे असो किंवा आम्ही... आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना ठेवायचे की नाही हा आमचा अधिकार नाही. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन अनेक वर्षे महाराष्ट्रात काम केलं. त्यादिवशी त्यांची चूक झाली आहे. त्यांना ठेवायचे की नाही ठेवायचे हा आमचा अधिकार नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील."


चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी अनेक विषयांवरही भाष्य केलं. आदित्य ठाकरे यांनी काल (29 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन वेदांता-फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्यावरुन पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. बावकुळे म्हणाले की, "ते (आदित्य ठाकरे) खोटं बोलत आहेत. आरटीआरमध्ये वेदांताबाबत माहिती समोर आली आहे की मागच्या सरकारने वेदांताला जागा दिलेली नाही. त्यासंदर्भात कुठेही बैठक घेतली नाही. त्यामुळे वेदांता परत गेला आहे, वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला आहे. उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग कंपन्या कोणाशी बोलल्या असत्या. त्या काळात कुठलेही शासकीय जीआर काढले नाही. जमीन दिली नाही. आता खोटारडेपणाचा कळस करत आहेत."


'मविआ सरकारच्या काळातील विमा कंपन्यांतील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करा' 
पीक विम्यावरुनही बावनकुळे यांनी मागील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. "महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले, मात्र अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. कोणत्याही पालकमंत्र्यांनी, कृषीमंत्र्यांनी आढावा घेतला नाही. खरिपाच्या आढावा बैठक सुद्धा त्या काळात झाल्या नाहीत. पीक विमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत होत्या. मात्र खरोखर शेतकऱ्यांना त्यांनी परतावा दिला की नाही हे पाहण्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर कोणाचंही नियंत्रण नव्हता. म्हणून विमा कंपन्यांनी त्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर पैसे खाल्ले. हे मागच्या मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांच्या प्रकरणात जो भ्रष्टाचार झाला आहे, त्याची  उच्चस्तरीय चौकशी करा अशी माझी मागणी आहे.


संजय राऊत नुसते टिव टिव करतात : बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. "संजय राऊत नुसते टिव टिव करतात, 'सामना'तून छापून आणतात आणि मग सकाळी मीडियासमोर येतात. आम्ही त्याच त्या बाबींना किती दिवस उत्तर द्यायचं," असं बावनकुळे म्हणाले.


VIDEO : Chandrashekhar Bawankule : राज्यपालांच्या समर्थनाची आमची भूमिका नाही