Aurangabad News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील पाच राखीव जागांचे निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाले. यामध्ये राष्ट्रवादी प्रणित व आ. सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने बाजी मारली आहे. पण याचवेळी मतदानाच्या आकडेवारीवरून पदवीधरांचा अडाणीपणा समोर आला आहे.कारण या निवडणुकीत तब्बल 23 हजार 921 म्हणजेच 21.66 टक्के मते अवैध ठरली आहे. मतदान करणारे सर्वच मतदार सुशिक्षित असतांना देखील एवढ्या मोठ्याप्रमाणावर मते अवैध ठरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

यावेळी मतदारांनी केवळ एकाच मतपत्रिकेवर मतदान करून इतर मतपत्रिका कोऱ्याच ठेवल्यामुळे इतर उमेदवाराला मतदान होऊच शकले नसल्याचा प्रकार या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर झाला. तर काहींनी मतपत्रिकेत वेगवेगळ्या भाषेत लिहिल्यामुळे तसेच काहींनी मतपत्रिकेवर सही केल्यामुळे हे मतदान बाद झाले. प्रत्येक राखीव गटामध्ये प्रत्येक प्रवर्गात साडेचार ते पाच हजार मतदान हे बाद ठरवण्यात आले. या निवडणुकीसाठी 36 हजार 254  मतदारांची नोंदणी झाली होती. तर यापैकी 18 हजार 400  जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. म्हणजेच एकूण 50.75 टक्के मतदान झाले होते. मात्र झालेल्या मतदानातून 21.66 टक्के मते अवैध ठरली आहे.   

प्रवर्ग  एकूण मतदान  अवैध मतदान 
महिला राखीव  14 हजार 885 4 हजार 476
अनुसूचित जाती  14 हजार 328 4 हजार 1
अनुसूचित जमाती  14 हजार 228 4 हजार 204
इतर मागास प्रवर्ग 13 हजार 842 4 हजार 689

सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू करण्यात आली होती, रात्री उशिरापर्यंत केवळ मतपत्रिकांचे वर्गीकरणच सुरू होते, राखीव गटासाठी मंगळवारी पहाटे प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली, यानंतर दुपारी पाच राखीव जागांचे निकाल जाहीर करण्यात आले व विजयी उमदेवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. 

विजयी उमेदवारांची यादी...

  • सुनील यादवराव मगरे (अनुसूचित जाती प्रवर्ग) : 8हजार 936 मते मिळाली.
  • सुनील पुंडलिकराव निकम (अनुसूचित जमाती प्रवर्ग) 8 हजार 51 मते मिळाली.
  • राऊत सुभाष किशनराव (इतर मागास प्रवर्ग ) : 9 हजार 433  मते मिळाली. 
  • पूनम कैलास पाटील (महिला प्रवर्ग):  8 हजार 2  मते मिळाली.
  • दत्तात्रय सुंदरराव भांगे (भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्ग) : 7 हजार 226  मते मिळाली.