MVA seat sharing Lok Sabha Election 2024 मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीकडून (MVA) जवळपास 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र उरलेल्या 8 जागांवरून तिढा कायम आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित आघाडीच्या (VBA) समावेशामुळे आता मविआमध्ये तिढा वाढणार की लवकर सुटणार याबाबत चर्चा सुरु आहेत. मंगळवारी 30 जानेवारीला महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास फायनल झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर उर्वरित 8 जागांचा तिढा अद्याप कायम आहे.
या 8 जागांमध्ये नागपूरमधील रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे. जिथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस याच जागांवर दावा करत आहेत. याशिवाय काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा मुंबई काँग्रेस मागत आहे. सध्या या आठही जागांवर शिवसेना (ठाकरे आणि शिंदे) आणि भाजप यांचे खासदार आहेत.
तिढा असलेल्या जागी विद्यमान खासदार कोण?
- रामटेक - कृपाल तुमाणे (शिवसेना शिंदे गट)
- हिंगोली - हेमंत पाटील (शिवसेना शिंदे गट)
- वर्धा - रामदास तडस (भाजप)
- भिवंडी - कपिल पाटील (भाजप)
- जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
- शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट)
- मुंबई दक्षिण मध्य - राहुल शिवाळे (शिवसेना शिंदे गट)
- मुंबई उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर (शिवसेना शिंदे गट)
उद्धव ठाकरे गटाचा जागा सोडण्यास नकार
मात्र मुंबईतील दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती. उद्धव ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीत हा तिढा सुटला नाही, तर हा मुद्दा तिन्ही पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या मविआमधील समावेशनंतर वंचित बहुजन आघाडीसुद्धा जागा वाटपासंदर्भात आपली भूमिका 2 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत ठेवणार आहे. वंचितसाठी अकोला लोकसभा मतदारसंघाची (Akola Lok Sabha 2024) जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मविआमध्ये या एकाच जागेवर समाधानी राहणार की आणखी जागांची मागणी करणार हे पाहावं लागेल. वंचित बहुजन आघाडीकडून अधिक जागांची मागणी झाल्यास हा तिढा आणखी वाढू शकतो.
पश्चिम महाराष्ट्रातील जागावाटप (Western Maharashtra seat Sharing)
राज्यात महाविकास आघाडीचे जागा वाटप (Mahavikas Aghadi Seat Sharing) जवळपास ठरले आहे. आधी मराठवाड्यातील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) जागावाटपावर सहमती झाल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यातील 10 लोकसभा जागा वाटप निश्चित झाले आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट दोन, काँग्रेस तीन आणि चार मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढवणार आहे. एक मतदारसंघ मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्याने त्यांना कोणत्या जागा सुटणार, याकडेही लक्ष लागले आहे.
मराठवाड्यातील जागावाटप (Marathwada Maharashtra seat Sharing)
मराठवाड्यातील महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं आहे.मराठवाड्यातील 8 जागांपैकी सर्वाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहेत. ठाकरे गटाला 4, काँग्रेसला 3 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. मात्र हिंगोलीच्या जागेवर तिन्ही पक्षांचे दावे असल्याने मविआच्या पुढील बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे.
संबंधित बातम्या