मुंबई: बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे. कारण, दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या (Disha Salian Death Case) चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आगामी काळात या आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे, असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नागपूर अधिवेशनात केली होती. यानंतर सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही नितेश राणे यांचा दावा होता. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या चौकशीत आता नितेश राणे नेमका काय जबाब देतात किंवा आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणते पुरावे सादर करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई पोलीस आयुक्तांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले होते. अप्पर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे एसआयटीचे प्रमुख आहेत. या एसआयटी पथकात क्राईम ब्रांच आणि इतर युनिट्सच्या तज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. 


8 जूनला आदित्य ठाकरेंचे मोबाईल लोकेशन कुठे? नितेश राणेंचा सवाल


याबाबत बोलताना नितेश राणे यांनी म्हटले की, मुंबई पोलिसांकडून माझ्याशी संपर्क करण्यात आला. दिशा सालियन - सुशांत सिंग राजपूत प्रकरणी चौकशीसाठी हा संपर्क करण्यात आला. माझ्याकडे  8 जून आणि 13 जूनबाबत अनेक पुरावे आहेत. या सगळ्याबाबत मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे. या हत्येतील आरोपी आजही मोकाट विधानसभेत फिरत आहे. या प्रकरणात तीनवेळा तपास अधिकारी बदलण्यात आले, मस्टरवरील पानं फाडली. तपास अधिकाऱ्यावर दबाव होता. तेव्हा आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री होते. नारायण राणे आणि माझी पोलीस ठाण्यात चौकशी झाली. त्यावेळी ठाकरेंकडून पोलिसांना वारंवर फोन येत होते. आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियानवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. ८ जून व १३ जून रोजी आदित्य ठाकरे कुठे होते,  त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळालेले आहे. 72 दिवसानंतर सीबीआयला या प्रकरणाचा तपास करू दिला, असे नितेश यांनी म्हटले.


8 जूनला आदित्य ठाकरे कुठे होते? ते आजोबा आजारी असल्याची कारणं देत आहेत. रोहन रायला कोणी गायब केलं? मस्टरवरील एन्ट्री कोणी फाडली?ना आम्ही पुण्यातल्या अग्रवालला सोडणार, ना आम्ही मिहीर शहाला सोडणार ना आम्ही आदित्यला सोडणार. दिशा सालियानचा शवविच्छेदन अहवाल कुठे आहे? काय झालं तेव्हा..? वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या बाहेर कोणाचा बंगला आहे? १३ जूनला कोणाचा वाढदिवस होता? कुणाची पार्टी झाली? तिथून सुशांतच्या घरी कोण गेलं?, असे अनेक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले.


काय आहे प्रकरण? 


मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू  8 जून 2020 रोजी झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.  शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. या दोन्ही आत्महत्या संशयास्पद असल्याचे सांगत तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते. 


आणखी वाचा


आदित्य ठाकरे आणि मला समोरासमोर बोलवा; दिशा सालियन मृत्यूप्रकरणात नितेश राणे आक्रमक