Mumbai North West Lok Sabha Constituency Election Result 2024 : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली.  आता किर्तीकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली. 

मतमोजणीत नाट्य...

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) उमेदवार अमोल किर्तीकर यांनी शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde Group) गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा अवघ्या 681 मतांनी पराभव केला. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) आणि शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यात पहिल्या फेरीपासून जोरदार चुरस होती. अमोल किर्तीकर यांचा 2424 मतांनी विजय झाल्याचे जाहीर झाल्यानंतर रविंद्र वायकर यांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. त्यानंतर किर्तीकर हे अवघ्या 681 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली होती.  त्यानंतर वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर पुन्हा मतांची मोजणी करण्यात आली.  ईव्हीएम मतांमध्ये अमोल किर्तीकर यांना 4 लाख 995 मते होती. तर रवींद्र वायकर यांना 4 लाख 994 मते होती. ईव्हीएममध्ये वायकरांना अवघे एकच मत अधिक होते. त्यानंतर 3049 पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये अमोल किर्तीकर यांना 1500 आणि रविंद्र वायकर यांना 1549 मते मिळाली.  

त्यानंतर वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. किर्तीकर यांनी आक्षेप घेतल्यानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची मोजणी करण्यात येत आहे. 

शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) मैदानात असून त्यांच्यांविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) मैदानात उतरले आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी मुंबई वायव्य (Mumbai North West Lok Sabha) हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघात मराठी मतदारांसह अन्य भाषिक मतदारांची मोठी संख्या आहे. त्याशिवाय विविध धर्मीय मतदार आहेत. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर  यांच्यात थेट लढत झाली. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. या मतदारसंघात 9 लाख 51 हजार 580 मतदानाची नोंद करण्यात आली असून 54.84 टक्के मतदान झाले. 

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा निकाल 2024 (Mumbai North West Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचे नाव मिळालेली मते  निकाल
अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे) 4 लाख 52 हजार 596 पराभूत
रविंद्र वायकर (शिवसेना) 4 लाख 52 हजार 644 विजयी

 

> लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभानिहाय किती मतदान झाले?

- जोगेश्वरी पूर्व - 57.11 टक्के
- दिंडोशी -  54.77 टक्के
- गोरेगाव - 54. 53 टक्के
- वर्सोवा - 53.15 टक्के
- अंधेरी पश्चिम - 53.65 टक्के
- अंधेरी पूर्व - 55.73 टक्के

 

2019 चा निकाल काय होता? (Mumbai North West Lok Sabha Constituency Result 2019)

शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना 5 लाख 70 हजार 063 मते मिळाली होती. तर, काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम 3 लाख 9 हजार 735 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश शेट्टी यांना 23 हजार 367 मते मिळाली होती. 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचे आमदार 2019 प्रमाणे...

जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर - शिवसेना 
दिंडोशी - सुनील प्रभू - शिवसेना 
गोरेगाव - विद्या ठाकूर - भाजप
वर्सोवा - भारती लव्हेकर - भाजप
अंधेरी पश्चिम - अमित साटम - भाजप
अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके - शिवसेना 

दोन वर्षापूर्वी शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीनंतर आता या मतदारसंघात ठाकरेंकडे सुनिल प्रभू आणि ऋतुजा लटके हेच दोन आमदार राहिले आहेत. तर, शिंदे गटाकडे एक आमदार आणि भाजपकडे तीन आमदार आहेत. 


वायव्य मुंबईत  उमेदवार जरी शिवसेना शिंदे गटाचा असला तरी निवडणूक जिंकण्यासाठी सारी भिस्त भाजपवर असल्याचे चित्र होते.  काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय निरुपम यांनी उत्तर भारतीय मते खेचण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर  नेते, लोकप्रतिनिधी यांनी त्यांना साथ दिली. पण, जमिनीवरील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे वायकरांना या निवडणुकीत मोठे आव्हान होते. त्या उलट अमोल किर्तीकर यांना शिंदे गटात गेलेले त्यांचे वडील मावळते खासदार गजानन किर्तीकर यांच्यासाठी पक्ष फुटीपूर्वी केलेल्या कामाचा फायदा झाल्याचे चित्र होते.  अमोल किर्तीकर यांच्यासोबत मतदारसंघातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आणि मतदारांना मतदानासाठी उतरवले. 

दोन्ही प्रमुख उमेदवार 'ईडी'ग्रस्त

वायव्य मुंबई  लोकसभा मतदारसंघात अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर  यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही उमेदवारांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. किर्तीकर यांच्याविरोधात मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू आहे. तर,  रविंद्र वायकर यांच्या विरोधात कथित भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर  उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणारे रविंद्र वायकर हे ईडीकडून झालेल्या चौकशीनंतर शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले.