Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या स्वागतसाठी मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत. शिंदे गटातील आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवाजी पार्कमधील स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात ठिकठिकाणी बॅनर लावलेले दिसतात. संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार शिवतीर्थावर दाखल होऊन बाळासाहेबांना अभिवादन करतील 


शिंदे गटाचा 'वारसा विचारांचा' परिसंवाद
17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने वाद टाळण्यासाठी एक दिवस आधीच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिंदे गटाकडून विशेष 'वारसा विचारांचा' परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिसंवादाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहाणार असून ते बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बाळासाहेबांच्या आठवणी, किस्से तसेच आगामी काळातली रणनीती आणि वाचळवीरांची शाळा असं हे शिबिर असणार आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता दादरच्या सावरकर स्मार इथे हा कार्यक्रम पार पडेल. 


शिंदे गटाकडून भव्य कार्यक्रमाचं आयोजन
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात एक दिवस आधीच शिंदे गटाने भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. दादरमधील सावरकर स्मारक इथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून तरुणांना मोबाईल व्हॅन (फूड ट्रकचं) आणि टुरिस्ट कारचं वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जाणार आहे. 


बाळासाहेबांचे विचार आपणच पुढे घेऊन जातोय हे दाखवण्याच शिंदे गटाचा प्रयत्न
बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. हिदुत्वाचा मुद्दा घेऊन शिंदे आणि भाजपने सत्ता स्थापन केली. बंडाच्या सुरुवातीपासून एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे आपणच वारसदार आहोत असाच दावा करत आहेत. आता त्याच बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी आपणच बाळासाहेबांचे विचार कसे पुढे घेऊन जात आहोत हेच दाखवून देण्याचा प्रयत्न असेल.


मोबाईल व्हॅन मविआ सरकारच्या काळातील, पण स्टिकर वेगळे: ठाकरे गटाचा आरोप
दरम्यान, पण या मोबाईल व्हॅन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असून फक्त स्टिकर वेगळे लावल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अरविंद भोसले यांनी केला आहे. तसा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. या व्हिडीओत असलेले ट्रक आणि त्याचे नंबर प्लेट आणि आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात येणाऱ्या ट्रकच्या नंबर प्लेट सारख्याच आहेत. महाविकास आघाडीच्या लाभार्थ्यांना पुन्हा तिच वाहने नव्याने देण्याचा प्रकार करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.