मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण (Mukhyamantri Ladli Behna) या योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. मात्र या योजनेसंदर्भात विरोधकांकडून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची कालमर्यादा काढून टाकावी, अशी मागणी केली जात आहे. आज विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान विरोधी बाकावरील पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी तर ही योजना फक्त निवडणुकीपुरती जाहीर करण्यात आलेली आहे. निवडणुकीनंतर ती बंद करण्यात येईल, असा दावा केला. त्यांच्या याच दाव्यावर मंत्री शंत्रूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी स्पष्टीकरण दिले. 


पृथ्वारीज चव्हाण काय म्हणाले?


राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे. महिलांना मदत दिली पाहिजे याबद्दल दुमत नाही. या योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै आहे. नोंदणी केंद्रामध्ये मोठी गर्दी झाली आहे. महिलांना उन्हात उभे राहून भोवळ येत आहे. चुकीचे प्रकार घडण्याची शक्यता आहे, असे मत चव्हाण यांनी मांडले.


अर्ज करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नसावी


सध्या महाराष्ट्रात पंढरपूरची वारी आहे. या वारीत 10 लाख वारकरी भाग घेतात. यात निम्म्या महिला असतात. मग महिलांनी वारी सोडून 15 तारखेच्या आत परत यायचं का? त्यामुळे या योजनेला दिलेली अंतिम मुदत रद्द करावी. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत नसावी. प्रत्येक महिलेला अधिकार दिला पाहिजे. ही योजना फक्त निवडणुकीपुरती आणायची आणि नंतर बंद करायची हे योग्य नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 


21 वर्षांवरील अविवाहित महिलांना योजनेचा लाभ नाही


या योजनेत 21 वर्षांवरील अविवाहित महिलांना घेतलेलं नाही. यात त्या महिलेचा काय दोष आहे. एखाद्या भगिनीचे लग्न झालेले नसेल किंवा त्या भगिनीला लग्न करायचे नसेल तर तिला ही मदत मिळणार नाही. तसेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही अट काढून टाकावी. आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंट्सचा सुळसुळाट झालेला आहे. एका-एका महिलेला उत्पन्नानाचा दाखला काढायला 700 ते 800 रुपये मागितले जात आहेत. त्यामुळे या योजनेसाठी 15 जुलैची अंतिम तारीख काढून टाकावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 


शंभूराज देसाई यांनी काय स्पष्टीकरण दिले?


पृथ्वाराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारतर्फे स्पष्टीकरण दिले आहे. "पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर प्रश्न उपस्थित केले. आम्हाला चव्हाण यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे. आम्ही ही योजना फक्त निवडणुकीपुरती आणली आहे, निवडणुकीनंतर आम्ही ती बंद करू, असं पृ्थ्वीराज चव्हाण सांगत आहेत. हा चुकीचा प्रचार केला जात आहे. तसं काहीही नाही. ही योजना शासनाने सभागृहात जाहीर केलेली आहे. या योजनेला काहीही कालमर्यादा नाही. ही योजना फक्त सहा किंवा एका वर्षासाठी असं कोठेही सांगितलेलं नाही. ही योजना कायम चालू राहणार आहे. म्हणून या योजनेबाबत गैरसमज पसरवू नये," असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. 


हेही वाचा :


Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी आजपासून ऑफलाईन अर्ज; पात्र, अपात्रतेचे निकष काय?


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात सेतू केंद्रावर महिलांची गर्दी