Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी तब्बल 30 तासानंतर संपली असून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजय घोषित केले आहे. दराडे यांना विजयी घोषित केल्यानंतर महायुतीचे पदाधिकारी आणि दराडे यांच्या समर्थकांनी जल्लोष आहे केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी किशोर दराडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले आहे.


विजयी उमेदवार किशोर दराडे हे पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रातून शिक्षक मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीसाठी हा विजय सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. या संदर्भात किशोर दराडे यांनी शिक्षकांचे आभार मानले आहे. तर उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊ चौधरी यांनी महायुतीच्या एकजुटीचा विजय असल्याचे मत व्यक्त केले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा किशोर दराडे यांना फोन


किशोर दराडे यांना विजयी घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. भाऊ चौधरी यांच्या फोनवरून दराडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. यावेळी साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उभाठा तीन नंबरवर. महाविकास आघाडीचा दारुण पराभव करून मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो, असे किशोर दराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितले. 


किशोर दराडे आणि विवेक कोल्हेंमध्ये जोरदार रस्सीखेच


दरम्यान, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  63 हजार 151 मते वैध ठरली तर 1 हजार 702  मते अवैध ठरली. मतमोजणी तब्बल 30 तास सुरु होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर होते. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र किशोर दराडेंनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर होते.


इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग


Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ