कोल्हापूर: लहानपणी माझे बाबा कायम शिवसैनिकांसोबत असायचे. त्यांना आमच्याकडे द्यायला वेळही नसायचा, असे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. ते शुक्रवारी शिवसेनेच्या (Shivsena) कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन बोलत होते. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे बालपणीच्या वडिलांसोबतच्या आठवणी सांगताना काहीसे भावूक झाले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कंठ दाटून आल्याने थोडावेळ त्यांना पुढे बोलताच आले नाही. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, शिंदे साहेबांना मी लहानपणी जे पाहिलं ते फक्त आणि फक्त शिवसैनिकांच्या गराड्यात. शिंदे साहेबांना माझ्यासोबत चांगले क्षण घालवता आले नाहीत. ते सतत लोकांना वेळ द्यायचे. आम्ही सतत तक्रार करायचो, तुम्ही आम्हाला वेळ कधी देणार? पण त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसायचं. या सगळ्या घटना सांगताना श्रीकांत शिंदे यांचा कंठ अचानक दाटून आला. त्यांना पुढे काही बोलणे शक्य होत नव्हेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अखेर काहीवेळानंतर डोळ्यांमधील पाणी टिपून त्यांनी पुढील भाषणाला सुरुवात केली. हे सगळे घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते समोरच बसले होते.
बाप चोरला, बाप चोरला म्हणणाऱ्यांना श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर
श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मला माझ्या बापाचा अभिमान आहे. माझ्या बापाने सर्व शिवसैनिकांनाच आपलं कुटुंब मानलं होतं. त्यामुळेच एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला. आज काही लोक रोज उठून 'बाप चोरला, बाप चोरला', असे ओरडत असतात. पण बाळासाहेब ठाकरे ही कोणा एका व्यक्तीची खासगी मालमत्ता नाही. बाळासाहेब ठाकरे हा सगळ्या महाराष्ट्राचा बाप होता, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.
आणखी वाचा
ठाकरे पिता-पुत्रांनी कल्याणमधून लढावं आणि जिंकून दाखवावं; खा. श्रीकांत शिंदे यांचं आव्हान
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार, 17 व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव