कल्याण: एक वेळ अशी होती की कल्याणमध्ये यांना उमेदवार मिळत नव्हता, त्या परिस्थितीत या ठिकाणी मी निवडणूक लढवली आणि जिंकली, त्यावेळी जर लोकांशी संपर्क ठेवला असता तर आता यांना गल्लोगल्ली फिरावं लागलं नसते अशी जहरी टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. ठाकरे पिता-पुत्रांनी कल्याणमधून निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावी असं आव्हानही त्यांनी दिलं. उद्धव ठाकरे यांनी आज कल्याण-डोंबिवलीचा दौरा केला, त्यावर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde On Kalyan Lok Sabha Election) यांनी प्रतिक्रिया दिली.
त्यावेळी कल्याणमध्ये उमेदवार मिळत नव्हता
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, 2014 मध्ये यांना उमेदवार मिळत नव्हता, तेव्हा शिवसेनेचा खासदार जो आहे पार्टी सोडून गेला होता. तेव्हा कल्याण लोकसभेची जागा कशी निवडून आणायची हा एक प्रश्न उपस्थित होत होता. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही विचार न करता मला उभं केलं. त्या विपरीत परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढलो, त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. तेव्हा यांना कुठलाही उमेदवार मिळत नव्हता, तेव्हा त्यांनी विचार केला नाही.
ठाकरे पिता पुत्रांनी कल्याण लोकसभेमधून निवडणूक लढवावी
ठाकरे पिता पुत्रांनी कल्याण लोकसभेमधून निवडणूक लढवावी असं आव्हान देताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, त्यांना जिथून लढायचे तिथून लढावं, कोपरीमधून लढायचे, कल्याणमधून लढायचे, मी तर म्हणतोय दोघांनीही लढा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कल्याणमधून लढावं आणि जिंकून दाखवावं. त्यासाठी देखील आम्ही तयार आहोत
आपल्या घरातील कोणाला तरी उभं केले पाहिजे, प्रचारासाठी जेवढी ताकद लावायची तेवढी ताकद लावली पाहिजे असं त्यावेळी ठाकरे म्हणाल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, तेव्हा ही जागा आपल्याला जिंकून आणायची होती. 2014 झाली, 2019 ला साडेतीन लाखाच्या फरकाने लोकांनी निवडून दिले. आता 2024 येत आहे, तेव्हा तुम्ही काउंट करा किती लाखाच्या फरकाने निवडून देतील. आमच्याकडे घराणेशाही नाही. जेव्हा पार्टीला गरज लागली तेव्हा आम्ही उभा राहिलो, विपरीत परिस्थितीमध्ये कल्याणची सीट आम्ही निवडून आणली.
घराणेशाहीच बोलायला लागला तर वरळीची सीट तुमच्या मुलासाठी घेताना सिटिंग आमदारांना घरी बसवलं, लोकांमधून निवडून येऊ शकत होते. स्वतःचा मुलगा निवडून आला पाहिजे, त्यासाठी दोघांबरोबर कॉम्प्रमाईज केले. स्वतःचा मतदारसंघ सेफ करण्यासाठी दोन दोन एमएलसी घालवल्या अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.
त्यांना तिकीट देऊन मी चूक केली उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, लोकांना कंटाळा आलाय लोकांना काम हवं आहे. आम्हाला जर सांगितले असते की इकडे लोकांची कमी आहे तर आम्ही इकडून पाठवले असते अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. फस्ट्रेशनमध्ये पातळी सोडून भाषण केले जाते. आम्ही कधीच पातळी सोडून कमेंट करत नाही आणि करणार नाहीत. मुख्यमंत्री आणि आमच्या आई-वडिलांची आम्हाला शिकवण आहे. आमच्यावर चांगले संस्कार आहेत. नाहीतर कोणालाही सकाळी झोपेतून उठल्यापासून शिव्या, टोमणे दिले असते.
या आधी जर लोकांशी संपर्क ठेवला असता तर आता गल्लोगल्ली फिरावं लागलं नसते अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. ते म्हणाले की, त्यांना जो रिस्पॉन्स मिळाला हवा होता तो त्यांना मिळत नाही, सर्व पक्ष एकत्र येऊन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यांनी एक चांगला उमेदवार शोधावा.
ही बातमी वाचा :