Rahul Shewale Vs Manisha Kayande : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांच्याविरोधात तक्रार केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी मनिषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका ज्येष्ठ नेत्यासोबत 2007 मध्ये लग्न करुनही 2011 साली त्याच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली. त्यानंतर संबंधित नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप शेवाळे यांनी केला आहे. त्याचसोबत मनिषा कायंदे यांनी संबंधित नेत्याकडून घर, वडिलांचा दवाखाना तसेच दुकानांचं फर्निचर करुन घेतल्याचा आरोप शेवाळे यांनी पत्रातून केला आहे. त्याचप्रमाणे कुप्रसिद्ध गुंड डी. के. राव याच्या मदतीने संबंधित ज्येष्ठ नेत्याला धमकावलं आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही राहुल शेवाळे यांनी केली आहे.
राहुल शेवाळे यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश
या सर्व प्रकरणाची सुरुवात दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरुन झाली. यानंतर अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यानंतर आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांची त्याच्या खासगी प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्या पीडित महिलेवर मुंबई पोलिसांचा दबाव आहे. त्या पीडित महिलेला मुंबईत यायचं आहे. पण दबावामुळे ती मुंबईत येऊ शकत नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या पीडित महिलेच्या जीवाला धोका असल्याचं कायंदे यांनी म्हटलं. यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
ज्येष्ठ नेत्याला ब्लॅकमेल आणि धमकी देण्यासाठी मनिषा कायंदेंनी गुंडांचा वापर केला, राहुल शेवाळे यांचा दावा
त्यानंतर आता प्रत्युत्तर म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. मनिषा कायंदे यांनी ज्येष्ठ नेत्याला ब्लॅकमेल आणि धमकी देण्यासाठी गुंडांच्या टोळीचा वापर केल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे. हे प्रकरण 2010-11 च्या दरम्यानचं आहे. आता या प्रकरणावर सरकार काही दखल घेतंय का हे पाहावं लागेल.