Mohit Kamboj Clean Chit : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) क्लीन चिट मिळाली आहे. कथित बॅंक घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) क्लीन चिट दिली आहे. मोहित कंबोज यांच्याविरोधात पुरावे नसल्याचं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आर्म्स ॲक्टअंतर्गत (Arms Act) दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही कंबोज यांची सुटका झालेली आहे.


मोहित कंबोज यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत सुमारे 52 कोटी रुपयांचे कर्ज बुडवलं असा आरोप झाला होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला होता. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करता मोहित कंबोज यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु ती टाळण्यासाठी कंबोज यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. जून 2021 मध्ये त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. आता या प्रकरणात कंबोज यांना क्लीन चिट मिळाली आहे. 


मोहित कंबोज यांच्यावर आरोप काय होते? 


मोहित कंबोज यांच्या कंपनीने साल 2011 ते 2015 या कालावधीत सुमारे 52 कोटी रुपयांचे कर्ज बुडवलं असा आरोप ठेवण्यात आला होता. मोहित कंबोज यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून कर्ज घेतले होतं. मात्र ज्या कारणासाठी कर्ज घेतलंय त्यासाठी त्याचा वापर केला नाही आणि ते अन्यत्र वळवण्यात आले. तसंच ही रक्कम परतही करण्यात आलेली नाही, अशी तक्रार आल्याने मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मोहित कंबोज आणि कंपनीच्या अन्य दोन संचालकांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. या तपासात कंबोज यांच्याविरोधात कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं सांगत आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना क्लीन चिट दिली आहे.


संजय पांडे आणि मोहित कंबोज यांच्यातील वादाची चर्चा


दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी संजय पांडे आणि मोहित कंबोज यांच्यातील वाद जोरदार चर्चेत आला होता. मोहित कंबोज यांनी आव्हान देत थेट संजय पांडे यांचेच आर्थिक घोटाळे बाहेर काढले होते. त्यानंतर संजय पांडे यांनाच अटक झाली होती. संजय पांडे यांची नुकतीच तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे.