नागपूर : वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) मुद्द्यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने (Shiv Sena UBT) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेला तिलांजली दिली. मनोज जरांगे (Manoj Jarange) किंवा लक्ष्मण हाकेंच्या (Laxman Hake) आंदोलनाला आमचा विरोध नाही. फक्त शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाच्या (Reservation) आडून अनेकांचा राजकीय आरक्षणावर डोळा असल्याचे मत मनसेचे (MNS) प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी व्यक्त केले आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर शिवसेना उबाठाची भूमिका अनाकलनीय आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला तिलांजली देणारी आहे. केवळ मतांसाठी कोणी वक्फ बोर्डाची तरफदारी करत असेल, तर ते अयोग्य असून मनसे शिवसेना उबाठाचा विरोध करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
वक्फ बोर्डावर सरकारचं नियंत्रण हवं
वक्फ बोर्डाशी संबंधित विधेयकाच्या वेळेला शिवसेना उबाठाचे सर्व खासदार कॅन्टीनमध्ये चहा प्यायला गेले होते. मुळात वक्फ बोर्ड घटनाबाह्य सत्ता आहे. सरकार देशातल्या प्रत्येक मंदिराकडून कर घेते. मात्र, वक्फ बोर्ड दरवर्षी 12 हजार कोटी रुपयांचा कर बुडवतो. त्यामुळे मनसेला वाटते की, हिंदूंच्या मंदिरांवर सरकारचे नियंत्रण असताना वक्फ बोर्डावर देखील सरकारचे नियंत्रण असायलाच हवे, असेही प्रकाश महाजन म्हणाले.
जरांगे, हाकेंच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही
सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत प्रकाश महाजन म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठवाड्याची भूमी तापलेली असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आरक्षणावर स्पष्ट भूमिका मांडली. आरक्षणासंदर्भात राज ठाकरेंची भूमिका अनेकांना पटली आहे. ज्या मोजक्या लोकांचा गैरसमज झाला आहे, त्यांनीच जाब विचारला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या जरांगेंच्या किंवा हाकेंच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. आरक्षण आर्थिक निकषांवर मिळावं, अशी आमची मागणी आहे.
राजकीय आरक्षणावर डोळा
या संपूर्ण संघर्षात राजकीय आरक्षण हाच खरा कळीचा मुद्दा आहे. शैक्षणिक आणि नोकऱ्यामधील आरक्षण आर्थिक निकषावर आधारित राहिले असते तर कोणाची अडचणच नव्हती. मात्र, अनेकांचा शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाच्या आडून राजकीय आरक्षणावर डोळा आहे, अशी टीकाही महाजन यांनी केली आहे.
लव्ह जिहाद आणि जातीय दंगलींचा प्रतिकार केला पाहिजे
दरम्यान, बांगलादेशच्या हिंदूंनी अडचणीच्या प्रसंगी संघटित होऊन प्रतिकार करत आपल्या सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. आपण ही लव्ह जिहाद आणि जातीय दंगलींचा प्रतिकार केला पाहिजे, असे मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.
आणखी वाचा
MNS : मनसे विधानसभेच्या 200 ते 225 लढणार, राज ठाकरेंच्या शिलेदाराने सांगितला प्लॅन