मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते प्रचारसभा कधी घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. राज ठाकरे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भाजपचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेणार आहेत. येत्या 4 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कणकवलीत सभा होणार आहे.
कणकवली येथील उप रुग्णालयासमोरील मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा होईल. नारायण राणे हे भाजप आणि महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेतील अशी चर्चा होती. अखेर राज ठाकरे हे महायुतीच्या बाजूने प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत आहे. नारायण राणे आणि शिवसैनिकांमध्ये असलेल्या हाडवैरामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजपवर एकमेकांवर टीका-प्रतिटीका, वार-प्रतिवार केले जात आहेत. मात्र, आता राज ठाकरे मैदानात उतरल्यास नारायण राणे यांच्या प्रचाराला आणखीनच धार चढणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उदय सामंत आणि नारायण राणे यांनी सभेसाठी राज ठाकरे अनुपस्थित असल्याची खंत बोलून दाखवली होती. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीयेत, त्यामुळे त्यांची आठवण येते, असे नारायण राणे यांनी म्हटले होते.
राज ठाकरेंचा महायुतीला बिनर्शत पाठिंबा
राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांच्यासाठी मी महायुतीला पाठिंबा देत असल्याचे सांगितले होते. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप मनसेसाठी एक ते दोन जागा सोडेल, अशी चर्चा होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी राज्यभरात सभा घेणार का, हा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर सिंधुदुर्गात राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार आणि कोणावर टीका करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा