भंडारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'नवनिर्माण यात्रेचा' दुसरा टप्पा विदर्भापासून सुरु झाला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी, तुम्ही मला बांधणी करून द्या, मग बाकी निवडणुकांना कसं सामोरं जायचं हे मी तुम्हाला सांगेन', असे म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. येथील मेळाव्यानंतर, त्यांच्या आजच्या दौऱ्यातील मुक्कामाचे ठिकाण अचानक बदलण्यात आले असून भंडारा शहराऐवजी ते मुक्कामासाठी साकोलीली निघाले आहेत. 15 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मराठवाडा दौरा केला होता. त्यावेळी, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी त्यांचा दौऱ्यात मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली होती. तर, बीडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकून आंदोलन केलं होतं.


मराठवाड्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरूवात झाली असून राज ठाकरे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. भंडाऱ्यातील (Bhandara) हॉटेल मीना येथे त्यांचा आज रात्री मुक्काम राहणार होता. मात्र, त्यांनी भंडाऱ्यात मुक्काम नं करता त्यांचा मुक्काम भंडारा जिल्ह्यातीलच साकोली येथील हॉटेल तुली इंटरनॅशनल इथे हलविला आहे. उद्या गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं राज ठाकरे यांचा दौरा आहे. उद्या एका दिवसाचं हे अंतर साधारणतः 300 किलोमीटर असल्यानं तो लांबचा प्रवास होणार आहे. त्यामुळे तो प्रवास त्रासाचा होईल, यादृष्टीने आजच भंडाऱ्यात मुक्काम न करता 50 किलोमीटर अंतर कापायचं या दृष्टीनं राज ठाकरे यांनी त्यांचा मुक्काम साकोली येथे हलविल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. राज ठाकरे यांचा ताफा हॉटेल मीना इथं असताना राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या, अशा स्थितीत राज ठाकरेंनी स्वतः त्यांची गाडी ड्राईव्ह करीत ते साकोलीकडे निघाल्याचा पाहायला मिळालं. 


राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यात त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा दौऱ्यावर आहेत. गोंदिया जिल्ह्याचा दौरा आटोपून राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा ताफा भंडाऱ्यात दाखल झाला. हॉटेल मीना येथील त्यांचा मुक्काम अचानक रद्द करुन त्यांनी साकोलीकडं प्रस्थान केलं. दरम्यान, अमित ठाकरे हे एसी वाहनात बसलेले असताना मनसैनिकांनी त्यांच्या गाडीला गराडा घातला. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरेंच्या नावानं घोषणाबाजीही केली. भंडाऱ्यातील पदाधिकाऱ्यांचे प्रेम बघून कारमध्ये बसलेले अमित ठाकरे अखेर वाहनातून खाली उतरले. त्यानंतर, पदाधिकाऱ्यांनी भगवी शाल, पुष्पगुच्छ आणि आई तुळजाभवानीची प्रतिमा देत सत्कार त्यांचा केला. कार्यकर्त्यांच्या सत्काराला भावनिक साद देत अमित ठाकरे यांनी सुद्धा आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.


हेही वाचा


धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले