मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील आमदार सतिश चव्हाण (Satish chavan) यांनी थेट भूमिका घेत महायुतीच्या कारभारावार टीका केली होती. महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही, असं सतीश चव्हाण यांनी म्हटलं होतं. आता, याप्रकरणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांने असे वक्तव्य करणे हे पक्षहिताला बाधा आणणारे आहेच, शिवाय महायुतीच्या कार्यप्रणालीला बाधा आणणारे आहे. त्यामुळे व्यक्ती किती मोठी असली तरी आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत कारवाई ही केली जाईल असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिले. आमदार सतिश चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केले. 


आमदार सतिश चव्हाण यांचे पत्र  वाचनात आले असून ते अत्यंत गंभीर आहे. पक्षाची शिस्त ज्यांच्याकडून भंग होईल ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. आमदार किंवा पक्षाचे वरीष्ठ नेते असतील त्यांच्याकडून अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देतानाच याविषयी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करेन शिवाय सतिश चव्हाण यांच्याशीही बोलून त्यांनी काय मानसिकतेतून हे वक्तव्य केले आहे हे जाणून घेईन. इतरवेळी न बोलता यावेळी बोलण्याचे कारण काय हेही समजून घेऊ. तरीही ते आपल्या विचारावर ठाम असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई ही केली जाईल असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. 


सतीश चव्हाण यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?


महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मंगळवारी (दि.15) निडवणूक आयोगाने जाहीर केला. मागील अडीच वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे. मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती, मात्र महायुतीचे सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवू शकले नाही, अशी खंत मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.


रिपोर्ट कार्ड जनतेसमोर


महायुतीच्या गेल्या अडीच वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीचे 'रिपोर्ट कार्ड' आजच पत्रकार परिषद घेऊन प्रकाशित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांनंतर पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगाराची संधी व इतर लोकोपयोगी कामे विशेष करुन अवर्षण भागामध्ये सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी घेतलेले क्रांतीकारी निर्णय आणि पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे नेण्यासाठी ठोस पावले उचलली गेली आहेत. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी यश मिळणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.


288 मतदारसंघात निरीक्षक


निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकांची घोषणा करत आचारसंहिता लागू केली आहे. त्यानंतर, आज काही लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला. 18 ऑक्टोबर पासून प्रवेशाची मालिका पक्षात सुरू होणार असल्याचे आपल्याला पहायला मिळेल असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने सामोरे जायला सज्ज झाला आहे. आम्ही 288 मतदारसंघामध्ये पक्षाचे निरीक्षक नेमणार आहोत. जे निरीक्षक पूर्ण वेळ त्या मतदारसंघात थांबतील. जबाबदार प्रमुख पदाधिकाऱ्यांवर मतदारसंघाची जबाबदारी देणार आहोत. महायुतीमार्फत जी यादी जाहीर झाली ती तिन्ही पक्षाचे समन्वयक होते. परंतु, पक्षाचे स्वतंत्र निरीक्षक आम्ही नेमणार आहोत. जेणेकरून निवडणूक प्रचारात कोणत्याही त्रुटी राहू नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे, असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. 


महायुतीची बैठक होणार


हरियाणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्याला आम्हाला सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर महायुतीची बैठक होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा म्हणून आरती साळवी यांची निवड केली आहे. दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून अशोक सावंत यांची नियुक्ती केलेली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता प्रभावी पक्ष संघटना उभारण्यासाठी अधिक जलदगतीने सुरुवात केली असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.