Maharashtra School uniform quality: एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
Maharashtra School uniform: शालेय गणवेशांच्या दर्जावरुन वाद निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गणवेश घालण्याच्या लायकीचे नाहीत.
मुंबई: राज्यातील सरकारी शाळांमध्ये वाटप करण्यात आलेल्या गणवेशाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले अनेक गणवेश हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले होते. यापैकी काही गणवशातील शर्टांना दोन खिसे दिसून आले होते. तर काही गणवेश धड शिवलेही नव्हते. या मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत एक जुना हिशेब चुकता केला. मध्यंतरी रोहित पवारांनी शालेय गणवेशांचा दर्जाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सभागृहात सर्वांदेखत रोहित पवार यांची टिंगल केली होती.
मात्र, आता अंबादास दानवे यांनी विद्यार्थ्यांच्या निकृष्ट गणवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री साहेब आठवतंय का ? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका.....अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही .
सभागृहात गणवेश दाखवताना “रोहित #quality बघ” असं तुम्ही म्हणाला होतात, आता हे गणवेश बघून हीच का महायुती सरकारची quality? हा प्रश्न पडतो. तुम्ही माझी चेष्टा करत असताना आजूबाजूला बसून दात काढणारे नेते आज गप्प का ? असो गणवेश देण्याच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वतःचे खिसे भरून घेणाऱ्या सरकारचा हिशोब करण्याची वेळ आता जवळ आली आहे आणि जनता हा हिशोब चुकता करेलच, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवलेय; अंबादास दानवेंची टीका
शालेय गणवेशांच्या निकृष्ट दर्जाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही संताप व्यक्त केला. 15 ऑगस्ट 2024 पर्यंत 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत, अशी टीका दानवे यांनी केली.
#मुख्यमंत्री साहेब आठवतंय का ? मी सभागृहात गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता तुम्ही माझी चेष्टा केली होती. माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांची तरी चेष्टा करू नका.....अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था… https://t.co/lmKNmlPukG pic.twitter.com/4XfT8GVv2X
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 30, 2024
आणखी वाचा
धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले