नागपूर : विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्याच्या तासगाव मतदारसंघातून विजयी झालेले युवक आमदार रोहित पाटील (Rohit Patil) हे नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने देखील अधिक सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. आपल्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढल्याने रोहित पाटील यांचं सभागृहातील भाषण गाजलं. तसेच, अनेकांच्या दिवंगत नेते व रोहित यांचे वडिल आर.आर. पाटील यांची आठवण देखील झाली. त्यानंतर, आता मतदारसंघातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्‍यांच्या गाठीभेटी घेऊन पत्रव्यवहार करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अनेकांना, मतदारसंघातील नागरिकांना आर.आर. आबांची आठवण होत आहे. विधानसभा नागपूर अधिवेशनामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. तसेच, शेतकरी व व्यापारी वर्गाला होणारा जीएसटीचा आर्थिक भुर्दंड कमी करण्याच्या हेतूने पत्रही दिले.


 शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बेदाणा विक्रीवरील व स्टोअरेजमध्ये ठेवलेल्या बेदाणा भाड्यावरती शासनाकडून 18% GST असून याच बेदाणा विक्रीवर 5% GST असा एकूण 23% GST चा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. शेतकरी व व्यापारी या दोन्ही घटकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्र्‍यांकडे मागणी केली आहे. त्यावर, मुख्यमंत्र्‍यांनी देखील त्यांना सकारात्मक उत्तर दिले. दरम्यान, आमदार रोहित पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने अनेकांना दिवंगत आर.आर. पाटील यांची आठवण झाली. सभागृहात देखील अनेक नेत्यांनी रोहित यांच्यासमवेत चर्चा करताना आबांच्या आठवणी जागवल्या आहेत. 


काय आहे भेटीचा विषय


सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात द्राक्ष पिक घेतले जात असून या सर्व तालुक्यात मिळून सुमारे 31,776 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष पिकाची लागवड असून शेतकरी तयार द्राक्षापासून बेदाणा निर्मिती मोठ्या प्रमाणात करून त्याला दर मिळण्याच्या अपेक्षेने तयार बेदाणा कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवत असतात. या स्टोअरेजमध्ये ठेवलेल्या बेदाणा भाड्यावरती शासनाकडून 18% GST असून याच बेदाणा विक्रीवर 5% GST असा एकूण 23% GST चा भुर्देड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. द्राक्ष पिक घेण्यासाठी भरपूर प्रमाणात औषधे फवारणी करावी लागते त्यावर ही 18% GST असल्याने शेतकऱ्यांचे प्रमाणापेक्षा जास्त मिळालेल्या उत्पादनाची रक्कम GST साठी जात असल्याने द्राक्ष्याची औषधे, स्टोअरेजमध्ये ठेवलेला बेदाणा व विक्रीवर बसविलेला GST माफी करावा व शेतकरी बांधवाना GST मुक्त करून त्यांना मदत करावी अशी विनंती.






रोहित पाटलांनी अजित पवारांची देखील घेतली भेट


आमदार रोहित पाटील यांनी आज सकाळीच अजित पवारांच्या नागपुरातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, आजा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा मुख्य प्रतोद रोहित पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा मतदारसंघातील डीपी (वीज वितरण) च्या कामांच्या अनुषंगाने आपण भेटायला आलो आहोत, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती. दरम्यान, रोहित पाटील यांच्या या भेटीगाठीमुळे अनेकांना दिवंगत नेते आर.आर. पाटील यांची आठवण होत आहे.  


हेही वाचा


जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या