Congress Misson 2024: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीबाबत पक्षांतर्गत सखोल विचारविनिमय सुरू असून, याच अनुषंगाने पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या नेत्या अंबिका सोनी, पी चिदंबरम, केसी वेणुगोपाल आणि इतर काही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक घेतली. प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सूचनांवर सखोल चर्चा होत आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की नाही आणि जर त्यांनी तसे केले तर त्यांची पक्षात काय भूमिका असेल याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाऊ शकतो.


निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे पुन्हा शुक्रवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर पीपीटी प्रेसेंटेशन  करणार आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तारिक अन्वर म्हणाले की, किशोर यांना बिनशर्त पक्षात प्रवेश घ्यायचा आहे आणि त्यांच्या येण्याने काँग्रेसला फायदा होईल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोरबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घ्यायचे आहे, असेही ते म्हणाले.


राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही आज संध्याकाळी सोनिया गांधी यांची भेट घेतली. राजस्थान हा त्यांच्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू असला तरी प्रशांत किशोर यांच्याबाबत विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यावर विचारमंथन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. काँग्रेस अध्यक्षांचीही भेट घेतली. त्यांच्या एका विषयाबाबत आपण सोनिया गांधींकडे गेलो होतो आणि या भेटीचा प्रशांत किशोर यांच्याशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: