मुंबई : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर विधानपरिषद (Vidhanparishad) निवडणुकीत महायुतीच्या सर्वच्या सर्व 9 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे, महायुतीच्या नेत्यांमध्ये आनंद आणि उत्साह दिसून येत असून या विजयाचे शिल्पकार म्हणून उपमुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातंय. मात्र, 11 जागांसाठी उभा राहिलेल्या 12 पैकी एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. तब्बल 5 वेळा विधिमंडळ सभागृहात सदस्य राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना राजकारण्यांनी धूळ चारली. या निवडणुकीत जयंत पाटील (Jayant patil) यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने जयंत पाटील यांना पुरस्कृत केले होते. तरीही, त्यांचा पराभव झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. आता, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनीही जयंत पाटील यांच्या पराभवावरुन महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोले केला आहे. 


विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर माजी आमदार कपिल पाटील यांनीही ट्विट करुन नाराजी व्यक्त केली होती. इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले? भाजपसारखेच? तूर्त रजा घेतो, पण कायम तुमच्या सोबत आहे, अशी खंत कपिल पाटील यांनी ट्विटमधून बोलून दाखवली होती. तर, भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्विट करुन महाविकास आघाडीतील उबाठा पक्षाच्या अजगराने शिक्षक भारती, शेकाप आणि कम्युनिष्ट या तिन्ही पक्षाला गिळल्याचं म्हटलं आहे. आता, मंत्री उदय सामंत यांनीही यावर प्रतिक्रिया देताना ठाकरेंना लक्ष्य केलं.  


विधानपरिषद निवडणुकीत फक्त काँग्रेसची नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मत देखील फुटलेली आहेत. तसेच ज्या आमदारांनी आम्हाला मदत केली आहे, त्यांच्याबाबतचा योग्य निर्णय वरिष्ठ घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलं. मिलिंद नार्वेकर यांच्या मागे कोण अदृश्य हात होते? याबाबत मी रात्री माहिती घेतलेली नाही पण दोन दिवसांमध्ये त्याची देखील माहिती घेणार आहे. काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कशा पद्धतीने छोट्या पक्षांना संपवते याची उदाहरण म्हणजे कपिल पाटील आणि जयंत पाटील यांचा झालेला पराभव. त्यामुळे, त्यांनी देखील आता याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. त्याचवेळी त्यांनी आशिष शेलार यांनी केलेले ट्विट योग्य असल्याचंही ते म्हणाले. 


संजय राऊतांना प्रत्युत्तर


दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना उदय सामंत यांनी उगाच कुणालाही बदनाम करू नका. तुम्ही देखील तुमच्या आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवले होते. आमच्यावरती पैशाच्या उधळपट्टीचा आरोप करत असताना तुम्ही काय केले? असा सवाल विचारत महायुतीचे सरकार राज्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.


काय म्हणाले आशिष शेलार


लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. गम्मत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती. तर, आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. 


हेही वाचा


जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादीचं एक मत फुटलं, काही मतं मिळाली असतो तर जिंकलो असतो, मविआबद्दल मोठं वक्तव्य