Ramdas Athawale on Rahul Gandhi : नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंदूंना दहशतवादी म्हणाले, राहुल गांधी स्वतःच दहशतवादी आहेत, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. तसेच, राहुल गांधींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम केलं आहे, असं म्हणत रामदास आठवलेंनी राहुल गांधींवर थेट निशाणा साधला आहे. 


केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (2 जुलै) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. रामदास आठवलेंच्या वक्तव्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सभागृहात हिंदूंबाबत वक्तव्य केलं. स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे लोक हिंसा आणि द्वेष पसरवत असल्याचं राहुल गांधी म्हणालेले. याबाबत केंद्रीय मंत्री आठवले यांना प्रश्न केला असता त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख दहशतवादी असा केला.


केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, "राहुल गांधींनी हिंदूंना दहशतवादी म्हटलं, ते स्वतः दहशतवादी आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करणं चुकीचं आहे. राहुल हिंदू समाजाला तोडण्याचं काम करत आहेत." राहुल यांच्या हिंदुंबाबतच्या वक्तव्यावर बराच गदारोळ सुरू आहे. सोमवारी (1 जुलै) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत आपलं म्हणणं मांडलं, तेव्हा चांगलाच गदारोळ झाला. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: उभं राहून संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निदर्शनास आणून दिलं. 


राहुल गांधी लोकसभेत बोलताना काय-काय म्हणाले? 


विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्व धर्मांनी दिलेल्या शिकवणुकीचा उल्लेख केला. यानंतर ते म्हणाले की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवण्याचं काम करतात. तुम्ही लोक अजिबात हिंदू नाही. हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही. राहुल यांचं हे वक्तव्य ऐकून सत्ताधारी चांगलेच संतापले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.


राहुल यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली होती. दरम्यान, पंतप्रधान मोदी उभे राहिले आणि म्हणाले की, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. मात्र, राहुल यांनी तत्काळ आरोपांना प्रत्युत्तर देत भाजप आणि नरेंद्र मोदी हे संपूर्ण हिंदू समाज नसल्याचं म्हणत पलटवार केला. आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही. राहुल यांनी आरोपांना उत्तर देताच विरोधी पक्षाच्या इतर खासदारांनीही त्यांना प्रोत्साहन दिलं. या वक्तव्यावरून संसदेत बराच गदारोळ झाला.


अमित शहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल


राहुल यांच्या हिंदूंबाबतच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी आक्षेप घेतला नाही तर गृहमंत्री अमित शहा यांनीही त्यांना आक्षेप घेतला. स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसाचार करतात, असे विरोधी पक्षाचे नेते सांगत आहेत, असे अमित शहा म्हणाले. त्यांना माहित नाही की करोडो लोक अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवतात, ते सगळे हिंसाचार करतात का? राहुलने माफी मागावी. आणीबाणीचा उल्लेख करून ते म्हणाले की, त्या काळात काँग्रेस सरकारने सर्वांना घाबरवलं होतं.


पाहा व्हिडीओ : Ramdas Athawale on Rahul Gandhi : राहुल गांधींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम केलं, ते दहशतवादी