MNS Avinash Jadhav Arrest: अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारपासून मनसे (MNS) आणि ठाकरे गटाच्या (Thackeray Camp) पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मात्र, मंगळवारी पहाटे पोलिसांनी त्यापेक्षा मोठी कारवाई केली. पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना ताब्यात घेतले आहे. अविनाश जाधव यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र, अविनाश जाधव मोर्चाला जाण्यावर ठाम होते. जाधव यांनी मराठी बांधवांना या मोर्चासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता मोठ्या फौजफाट्यासह अविनाश जाधव यांचे निवासस्थान गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले. अविनाश जाधव यांना सध्या काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. (Mumbai Police take MNS leader Avinash Jadhav into custody)

Continues below advertisement


अविनाश जाधव यांच्यानंतर पोलिसांकडून मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वसई आणि विरारमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये आजच्या मोर्चावर अनिश्चततेचे सावट निर्माण झाले आहे. हा मोर्चा आज सकाळी  10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होणार असून, मिरा रोड स्टेशन परिसरात त्याची सांगता होणार आहे.


MNS Morcha in Mira bhayandar: पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा जाधवांचा आरोप


पोलिसांनी मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, मराठी आमची आई आहे आणि आईसाठी कोणताही गुन्हा घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. हा मोर्चा नियोजित वेळेवर आणि ठिकाणी निघणारच, असा निर्धार अविनाश जाधव यांनी व्यक्त केला होता. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईबाबातही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मराठी जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा आणली जात आहे. पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. 


MNS Morcha Marathi: मनसेचा मोर्चा नेमका कशासाठी?


मीरा-भाईंदर शहरात मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी सर्व मराठी संघटना, राजकीय पक्षातील मराठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी समाज मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. शहरात मराठी भाषेला दुय्यम स्थान देणे, मराठी व्यक्तींना घर देण्यास नकार देणे, तसेच विशिष्ट समाजाच्या नावाने शहरात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे मराठी जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या सगळ्याविरोधात हा मोर्चा काढला जात आहे.


आणखी वाचा


भाषासक्तीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका, मीरा भाईंदर राड्याप्रकरणी FIR