Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेवरुन धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या खातेवाटपामध्ये धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल (22 डिसेंबर) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून मागणी हकालपट्टी करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीय. तर याच मुद्यावरून आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाने तातडीची बैठक बोलवली आहे. आज सकाळी 11 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अंकुश कदम पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा या बैठकीत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्याचे पालकत्व मंत्री फडणवीस यांनी घ्यावं- सुषमा अंधारे
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 14 दिवस होऊन गेले आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणातील तीन आरोपी फरारच आहेत. त्यातच देशमुख कुटुंबीयांची मस्साजोग येथे भेट घेण्यासाठी विविध राजकीय नेते येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. मी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांच्या भावना तीव्र आहेत. फडणीस यांनी जिल्ह्याच पालकत्व न स्वीकारल्यास हे प्रकरण प्रभावित होण्याची भीती कुटुंबीयांना आहे. या प्रकरणाचा छडा लागावा आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणातील जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींवर गुन्हे दाखल करत हा खटला फास्टट्रॅक कोर्टात मध्ये चालवावा, असेही अंधारे म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा