Aditya Thackeray: जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते उपमुख्यांनी दिलं आहे. त्यामुळे खरे अधिकार कोणाकडे आहेत ते जनतेच्या लक्षात आलं. आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर राज्यात जात आहेत. हे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर सांगण्यात आलं की, दुसरे मोठे प्रकल्प आणू. परंतु, महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे, असं ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. 


फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प वेगवेगळे, फडणवीसांची माहिती दिशाभूल करणारी: आदित्य ठाकरे 


आकड्यांचा खेळ करुन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यातून बाहेर गेलेला वेदांता फॉक्सकॉन आणि आधीचा फॉक्सकॉन प्रकल्प वेगळा असल्याचंही ते म्हणाले. राज्यातून आता बाहेर गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरचा असून 2020 साली बाहेर गेलेला फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल संबंधित होता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पबाबतची टाइमलाईन सांगितली


वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पबाबतची टाइमलाईन ही त्यांनी सांगितली आहे. ते म्हणाले आहेत की, ''15 डिसेंबर 2021 केंद्र सरकारने 76 हजार कोटीची सबसिडी जाहीर केली. ज्यात त्यांनी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले पॉलिसी आणली. 5 जानेवारी 2022 रोजी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट वेदांताने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणाला दिले. 11 जानेवारी 2022 महाराष्ट्र सरकारने यावर प्रतिसाद दिला. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टला अप्रूवल दिलं. यानंतर 16 जानेवारीला वेदांताने परत राज्य सरकारला लिहिलं आणि याबाबत थोडी स्पष्टता मागितली.  20 जानेवारीला याबाबत बैठक झाली. त्याआधी 19 जानेवारीला माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनिल अग्रवाल यांना पात्र लिहिलं की, आपण महाराष्ट्रात आल्यास आम्ही स्वागत करू आणि जी काही मदत लागेल ती आम्ही देऊ.''


आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, 28 जानेवारी 2022 राज्य सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणावर त्यांचे काही प्रश्न होते, ते त्यांनी विचारले. यावर राज्य सरकराने 1 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचे जे काही प्रश्न होते, त्याबाबत माहिती दिली. 19 फेब्रुवारी रोजी वेदांताच्या टीमने आपण 24 फेब्रुवारीला साइट विझिट करू, असं सांगितलं.  24 फेब्रुवारीला त्यांची टीम तळेगावला जाऊन आली. त्यांच्यासोबत त्यांची टेक्निकल टीम आणि इतर अधिकारी ही होते. याबाबत त्यांनी संपूर्ण रिपोर्ट बनवला आणि 5 मार्च 2022 पासून डिटेल साइट विझिटचा जो डेटा  होता, तो सरकार आणि वेदांतसोबत शेअर करण्यात आला. 3 मेला पुन्हा एकदा साइट विझिट झाली. 5 मेला पुन्हा त्यांनी दुसरं एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट पाठवलं. ज्यावर महाराष्ट्र सरकारने प्रतिसाद दिला. 6 मेला मी (आदित्य ठाकरे), देसाई आणि मुख्य सचिवानी त्यांची भेट घेतली. या भेटीचं ट्वीटही केलं होतं. 14 मेला वेदांताने गुंतवणूक करण्यासाठी अर्ज राज्य सरकारला पाठवलं. यात त्यांनी तपशीलवार माहिती दिली होती.  यात त्यांचा राज्य सरकराचा आणि केंद्र सरकारचा काय हिस्सा राहणार, याची माहिती देण्यात आली होती. ही सर्व माहिती त्यांनी एमआयडीसीला सांगितली होती. 24 मे रोजी मी आणि देसाई यांनी अनिल अग्रवाल यांची भेट घेऊन महाराष्ट्रात हा प्रकल्प करण्यासाठी जी काही मदत लागेल ती देऊ, तसेच याबाबत चर्चा केली होती, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.