Abdul Sattar: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे उद्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांना राज्यातील अतिवृष्टीबाबतची माहिती दिली जाणार असल्याचं राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे. सोबतच राज्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक यावे अशी मागणी करत, नुकसानभरपाईसाठी केंद्राने मदत करण्याबाबत मागणी देखील करणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहे. तसेच पीक विमाबाबत ज्या काही जाचक अटी आहेत त्याही कमी कराव्यात अशा पद्धतीची मागणी सुद्धा केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांच्याकडे करणार असल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे. औरंगाबाद येथे माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, नुकसानग्रस्त भागातील अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याचे आरोप केले जात आहे. मात्र कुणीही पंचनामे करण्यापासून सुटणार नाही. संपूर्ण पंचनामे झाल्यावर आढावा घेऊन, मदत देण्याबाबत अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मांडण्यात येईल असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
राणा-बच्चू कडू वाद मिटला...
तर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राणा-बच्चू कडू यांच्या वादावर प्रतिक्रिया देतांना सत्तार म्हणाले की, राणा आणि बच्चू कडू यांचा वाद आता मिटला असून, याचा आनंद आहे. राजकारणात अशा गोष्टी सुरू असतातच, दोघेही मोठे नेते आहेत. दोघांच्या भांडणात कार्यकर्त्यांना त्रास होतो, त्यामुळे ही भांडण दूर झालेली बरी असं अब्दुल सत्तार म्हणाले. महाभारतात शह काटशाह राजकारण चालतं, तसंच राजकारणातही चालतं आणि हे असं सुरू राहणार. मात्र श्रीकृष्ण सगळ्यांना योग्य वाट दाखवतो असे सत्तार म्हणाले.
आम्हाला धमक्या दिल्याने सुरक्षा पुरवण्यात आली...
सत्ताधारी यांना सुरक्षा पुरवण्यात येत असून,विरोधकांची सुरक्षा काढून घेण्यात येत असल्याचा आमच्यावर होत असलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याच सत्तार म्हणाले. आम्हाला काही लोकांनी चेतावणीखोर भाषेत मारण्याचे धमकी दिली होती. त्यामुळे आम्हाला सुरक्षा आहे. तर आम्ही कुणाबाबत मारण्याची भाषा करत नाही, म्हणून काही लोकांची सुरक्षा काढली असावी. आता नार्वेकर यांना सुरक्षा आहे, म्हणजे ज्यांना त्रास किंवा धोका आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा कायम असल्याचं देखील सत्तार म्हणाले.