Manoj Jarange Patil, Beed : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर जरांगे (Manoj Jarange Patil) बीडमधून एल्गार पुकारणार आहेत. अंतरवाली सराटी नंतर आता बीड तालुक्यातल्या नारायणगडावर मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठी सभा होणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. मनोज जरांगे यांनी बीडच्या नारायण गडावर बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते.
काय म्हणाले मनोज जरांगे?
सभा घेण्याची वेळ सरकारमुळे आली आहे. सगे सोयरे अध्यादेश आणि मराठा समाजाला आरक्षण अद्यापही सरकारने दिलेले नाही. दुसरीकडे मराठा बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी आता नारायण गडावर 9 एकरावर मोठी सभा होणार असून सहा करोड मराठे या सभेला येणार आहेत, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. सभेला येणाऱ्या लोकांच्या जेवणाची आणि राहण्याची पार्किंगची व्यवस्था चोख करण्यात येणार असून राज्यातील सर्वच मराठा बांधवांनी या सभेला यावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं आहे.
माझा फोटो आणि नाव निवडणुकीत कोणीही वापरू नये
आपल्याला विरोध न करणाऱ्या नेत्यांना मराठा आंदोलकांनी त्रास देऊ नये. लोकसभेच्या निवडणुकीत मी कोणताही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे माझा फोटो आणि नाव निवडणुकीत कोणीही वापरू नये, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या केज तालुक्यातील पावनधाम या ठिकाणी दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी अरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा बांधवांनी त्यांची गाडी अडवली होती. त्याबाबत जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आंदोलनात मला सरकारने हलक्यात घेतलं
मराठा आरक्षणाला विरोध न करणाऱ्या कोणत्याही नेत्याला मराठा आंदोलकांनी त्रास देऊ नये. त्याचबरोबर हिंसक आणि जाळपोळ करून कोणीही आंदोलन करू नये. जर आरक्षणाच्या विरोधात आणि समाजाच्या विरोधात कोणी जात असेल तर त्याच्या विरोधात जाण्यासाठी सर्वात पुढे मी असेन. आंदोलनात मला सरकारने हलक्यात घेतलं. मात्र राजकारणात हलक्यात घेऊ नये, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी सगे सोयरेची अंमलबजावणी झाली नाही तर विधानसभा निवडणुकीत सरकारला घेरणार, असं स्पष्ट केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या