मुंबई: मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करायला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू आहे. काहीही झालं तरी ओबीसीतून आरक्षण घेणार, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. या दरम्यान पोलिसांकडून जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटी-शर्तींसह आंदोलनास परवानगी देण्यात आलेली होती. परंतु या आंदोलनात नियमांची पायमल्ली होत असल्याचं सांगत काल मुंबई हायकोर्टाने आंदोलकांनी व्यापलेले दक्षिण मुंबईतील रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही जरांगे यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आज मनोज जरांगे यांनी आंदोलकांशी संवाद साधताना त्यांना गाड्या पार्किंगला लावण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर न्यायलयाच्या आदेशाचं पालन करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. 

Continues below advertisement


मराठे काय असतात हे 350 वर्षांनी पुन्हा एकदा बघायचं असेल तर


यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं की, जिकडे घुसायचं नाही, तिकडे घुसू नका. सरकारला आव्हान देत जरांगे म्हणाले, आझाद मैदानातून हाकलवून देऊ, वल्गना बंद करा. मी मेलो तरी आझाद मैदानातून हटत नाही. मग परिणामी फडणवीस कुठल्याही थराला गेले तरी मी देखील तयार आहे त्या थराला जायला. मराठे काय असतात हे 350 वर्षांनी पुन्हा एकदा बघायचं असेल तर मला नाईलाज आहे, मी मरेपर्यंत इथून हटत नाही, असंही जरांगेंनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. 


कितीही त्रास झाला तरी शांत राहायचं...


जरांगे म्हणाले, माझा नाईलाज आहे, मी मरेपर्यंत इथून हटणार नाही. मी मराठ्यांना काल देखील सांगितलं आहे, आजही सांगतो, गाड्या पार्किंगला लावा. मैदानात लावा, रेल्वेने प्रवास करा, बसने प्रवास करा. कुठे पार्किंगला जागा नसेल तर वाशीला नेऊन गाड्या लावा. दिलेल्या मैदानामध्ये गाड्या लावून मग या. तुम्ही शांत राहायचं.  माझी तब्येत कितीही खराब झाली तरी देखील तुम्ही शांत राहायचं. वेड्यासारखं करायचं नाही. मला माहिती आहे, तुम्हाला माझी माया येते मलाही तुमची माया येते तरी कितीही त्रास झाला तरी शांत राहायचं. मी मेल्यानंतर तुम्ही तरीही शांत राहायचं, असं माझं तुम्हाला आवाहन आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा पण माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा. ही लढाई आपण शांततेत लढायची. पण मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही, मी हे देवेंद्र फडणवीसांना ठासून सांगतोय, मी मरेपर्यंत मुंबई सोडणार नाही, फक्त कारणं करू नका. न्यायलयाच्या सर्व निर्णयाचं आपण पालन करायचं आहे. न्यायदेवता आपल्या गोरगरिबांचा आधार आहे. गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला न्याय देईल, असंही मनोज जरांगे यांनी बोलताना म्हटलं आहे. 


फडणवीससाहेब आम्ही शांत आहेत, शांत राहू द्या


त्याचबरोबर, न्यायालयाच्या एका शब्दांनुसार आम्ही कुठेही मुंबईत ट्रॅफिक केली नाही. यापेक्षा अजून काय पालन करायला पाहिजे. पुढेही न्यायदेवता म्हणेल तसंच पालन करत राहणार. विषय आता सरकारचा, सरकार आणि फडणवीस यांना सांगतो सगळ्या मागण्याची हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थान गॅजेट याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई आम्ही सोडणार नाही. मराठा आणि कुणबी एकच या शासन निर्णय शिवाय मुंबई सोडणार नाही. सगेसोयरे अंमलबाजवनीमध्ये काय अडचणी आहे ते आम्हाला सांगा. आता पर्यत 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. आता या नोंदी ग्रामपंचायतला चिटकवून तातडीने प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली पाहिजे. देवस्थानचे दस्तवेज शोधले गेले नाही ते शोधले गेले पाहिजे. पोलीस पाटील रेकॉर्ड शोधणे गरजेचं आहे, हे काम शिंदे समितीने करावं. शिंदे समितीला स्वतंत्र कार्यालय द्यावं, मोडी लिपी समजणारे अभ्यासक त्यांना द्यावे. फडणवीससाहेब आम्ही शांत आहेत, शांत राहू द्या, असंही पुढे जरांगेंनी म्हटलं आहे.