जालना : राज्यातील यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रखरतेनं जाणवला. त्यामुळे, उपोषणकर्ते व मराठा आरक्षणासाठी (Maratha) लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणुकांपूर्वीच नेतेमंडळींची रांग लागल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. याउलट राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसींच्या (OBC) यादीत नव्या 15 जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यावरुन, आता उपोषणकर्ते व मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला संतप्त सवाल केले आहेत. ज्या जातींचा ओबीसीत समावेश करत आहात, त्याबाबत महाविकास आघाडीकडून लिहून घेतलंय का, असा प्रश्न जरांगे यांनी विचारला आहे.  


राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये, जवळपास 80 निर्णय घेण्यात आले असून अनेक महामंडळांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्रातील 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या प्रस्तावालाही गती देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या 15 जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी करत, केंद्र सरकारकडे शिफारस प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावरुन, आता मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसींचे येवल्याचे नेते आता कुठे गेले, मराठ्यांच्या बाबतीत सरकारचे डोळे गेले आहेत, आता ओबीसी नेते कुठे झोपले आहेत, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला आहे, आत्ता या जातींना विरोध का नाही, असा टोलाही जरांगे यांनी नाव न घेता भुजबळांना लगावला. 


मराठे आता शहाणे होतील, मराठ्यांचे डोळे उघडणे गरजेचं होतं. सरकारने या जातींना ओबीसीत घेतांना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं आहे का?, असा संतप्त सवालही जरांगे पाटील यांनी विचारला. हे एकमेकांना लिफ्ट देत आहे, मराठ्यांना आरक्षण देतांना यांना त्रास होतो, एवढा जातीयवाद कशासाठी, असेही जरांगे यांनी म्हटले. 


सरकारने शिफारस केलेल्या 15 जातींची यादी 


बडगुजर 
सूर्यवंशी गुजर 
लेवे गुजर 
रेवे गुजर 
रेवा गुजर 
पोवार, भोयार, पवार 
कपेवार 
मुन्नार कपेवार 
मुन्नार कापू 
तेलंगा 
तेलंगी 
पेंताररेड्डी
रुकेकरी 
लोध लोधा लोधी 
डांगरी


हेही वाचा


मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख