मुंबई : राज्यात एकीतकडे विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा (Maratha) लढा अधिक तीव्र होत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी 17 सप्टेंबरपासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली असून दुसरीकडे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनीदेखील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत, राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आता, आमदार राऊत यांच्या आंदोलनावर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोरगरिबांच्या लोकांसाठी आम्ही लढत आहोत. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहेत, असे म्हणत राऊत यांचे आंदोलन सरकारी असल्याचा टोला जरांगेंनी लगावला आहे. 


आमदार राजेंद्र राऊत यांनी सुरु केलेल्या आंदोलनास सरकारी आंदोलन म्हणत फडणवीसांनाही लक्ष्य केलं. समाजासाठी आम्ही किती लढलो हे समाजाला माहित आहे, समाज हुशार आहे, समाज सगळं बघतोय. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर मस्ती आली ना, दिवस जवळ आले आहेत, समाज सगळं बघतोय, त्यांचा हिशेब होणार, असे म्हणत मनोज जरांगे यांनी राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनावर तोफ डागली आहे. राजकीय पक्षाचे जोडे उचलणारे, राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले किती गेले हे सगळे भाजप संपणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांच्याविरुद्ध बोलणाऱ्या भाजप आमदार व नेत्यांवर जरांगेंनी पलटवार केला आहे. तसेच, कोणी लक्ष द्यावं म्हणून मी उपोषण कधीच करणार नाही, एक वर्ष झालं मी समाजासाठी आंदोलन करतो. मी कसला विचार करत नाही, मी कोण येणार आहे, कोण येणार नाही. थोडे दिवस थांबा तुमचं राजकीय करिअर बाद करतो, असेही जरांगे यांनी भाजप नेत्यांना म्हटलं आहे. 


फडणवीस फोडाफोडीत हुशार


असलं रडकं सरकारच नाही बघितलं मी केव्हाच, फडणवीस साहेब लय हुशार आहेत, चाणक्य असं वाटायचं. पण, ते फक्त फोडाफोडीत हुशार आहेत. फडणवीस साहेब तुम्हाला इमानदारीने सांगतो तुम्हाला विरोधक, शत्रू मानलेलं नाही, तुम्ही आरक्षण देऊन टाका, असे जरांगे यांनी म्हटलं आहे. 



राहुल गांधींवरही निशाणा


आरक्षण रद्द करायचा विचार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं, त्यासंदर्भात जरांगे यांनी भूमिका मांडली आहे. काय करायचं कर म्हणा, आली तर पाहिजे ना सत्ता त्यांची, यायच्या आधीच कुठून रद्द करतो. त्याची सत्ता तर आली पाहिजे ना. परदेशातून बोलला की समुद्रात उभा राहून बोलला मला काय माहिती. त्यांचा राजकीय मामला आहे, तो आमच्याशी काही संबंध नाही. 


सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या - राऊत


स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा समाजाला झुलवत ठेवू नये व महाराष्ट्राचा मणिपूर करु नये. सर्वच राजकीय पक्षांनी अंधारात भूमिका न मांडता विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवून त्यात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे. तसेच, जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं असेल तर तसे सांगावे. मात्र, समाजाला झुलवणे बंद करावे. त्यासाठी, राज्यातील सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करा, बाकी काहीही बोलू नका असा टोलाही राऊत यांनी नाव न घेता मनोज जरांगेंना लगावला.


हेही वाचा


... तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार घालावा; आमदार राऊतांचे आवाहन, बार्शीत ठिय्या