मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहेत. नेत्यांच्या गाठीभेटी, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच आज बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झाले. या भेटीनंतर राजेसाहेब देशमुख यांनी या भेटीत काय घडलं याबाबतची माहिती दिली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीवेळी परळी विधानसभा मतदारसंघाचे अनुषंगाने चर्चा झाली. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. काँग्रेसला ही जागा मिळावी अशी आम्हाला अपेक्षा राहील. शरद पवार हे मोठ्या मनाचे आहेत याबाबत विचार करतील अशी अपेक्षा आहे, असं यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे भ्रष्टाचारी
त्याचबरोबर राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी बजाज अलायन्स नावाची पिक विम्याच्या अनुषंगाने कंपनी आणली. मात्र, एकालाही पीक विमा दिला नाही. बीड जिल्ह्यात हजारो शेतकरी आहेत. विचार करा किती कोटींचा हा भ्रष्टाचार असेल. भ्रष्टाचाराची रक्कम कुठे जाते हे तुम्ही पाहिला असेल असा हल्लाबोल यावेळी त्यांनी केला. तर काल परवा रश्मिका मंदाना या अभिनेत्रीला परळीमध्ये आणलं यांनी तब्बल 2 कोटी रुपये त्या अभिनेत्रीला दिले. काय गरज होती? एकीकडे पूर परिस्थिती आणि दुसरीकडे नाच गाण्याचा कार्यक्रम होताय असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे. यांनी हेमा मालिनींना देखील आणलं हेमा मालिनी स्टेजवरून म्हणाल्या, अरे इथं गर्दी नाही असं कसं काय? मुळात यांनी केलेला भ्रष्टाचार इतका आहे. की, कोण यांना बघायला जाईल जर अभिनेत्रीला पाहायला गेले असते तर ठीक होतं. मात्र हेच भ्रष्टाचारी लोक तिथे असतील तर जनता त्यांना माफ करणार नाही असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत देखील आम्ही काम केलं आहे. त्यांनी कधीही जातिवाद केला नाही. मात्र धनंजय मुंडे प्रचंड जातीवादी आहेत. सध्या बीड जिल्ह्यात जो जातिवाद निर्माण झाला आहे. याला सर्वस्वी ते जबाबदार आहेत. याचे उदाहरण पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी यांनी लक्ष्मण हाकेंना आणून बसवलं होतं वडीबुद्रुक येथे जे आंदोलन केलं त्याला सर्वस्वी पाठिंबा हा धनंजय मुंडे यांचाच होता अशा प्रकारचा जातीवाद बीड जिल्ह्यात पाहिलेला नाही असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं आहे.
राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर दावा?
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर काही दिवसांपुर्वीत दावा केला होता, मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. याच अनुषंगाने मतदारसंघात बैठका घेत ते जनतेशी संवाद साधत आहेत. तर राजेसाहेब देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली आहे.