Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ कमालीचे नाराज आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच छगन भुजबळ यांची गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ यांनी दोनदा भेट झाली आहे. तसेच पुण्यातील एका कार्यक्रमात छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकत्र आले होते. यावेळी शरद पवारांनी कार्यक्रमाच्या पत्रिकेवर एक संदेश लिहिला. छगन भुजबळ यांनी तो संदेश वाचला. त्यानंतर दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाला आणि दोघे एकमेकांकडे बघून हसले होते. त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटातच राहणार की? वेगळा काही निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्या गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या व्यक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे की, भुजबळ साहेबांना माहिती आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. पण कलगीतुरा नको. पार्टीकडून मला आदेश आले आहे की, भाष्य करू नये, त्यांच्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
माणिकराव कोकाटेंचा ठाकरे गटाला टोला
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मोठी घोषणा केली. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी म्हटले. यावरून माणिकराव कोकाटे यांनी ठाकरे गटाला टोला लगावलाय. त्यांनी म्हटलंय की, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय करावे? कुणासोबत लढावे? कुणासोबत लढावे? उघडे लढावे की कपडे घालून लढावे,तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटते आहे त्यांनी ते करावे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.