Mangal Prabhat Lodha Family: मंत्री आणि भाजप नेते मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्या दोन मुलांमधला वाद न्यायालयात गेल्याचं पाहायला मिळत आहे. उद्योग समुहाचा लोगो वापरण्यावरुन दोन सख्खे भाऊ न्यायालयात आमने-सामने आले आहेत. 


अभिषेक लोढा आणि अभिनंदन लोढा बंधूंमध्ये 'लोढा' हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. धाकट्या भावाला लोढा हे नाव वापरण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी अभिषेक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच अभिषेक लोढा यांनी 5 हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगजगतातील आणखी एका प्रतिथयश कुटुंबाला तडा गेल्याचं बोललं जात आहे. 


नेमकं प्रकरण काय?


बीएसई-लिस्टेड रिॲल्टी फर्म मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे सीईओ अभिषेक लोढा यांनी कोर्टाला त्यांचा लहान भाऊ अभिनंदन लोढा यांना त्यांच्या कुटुंबाचे नाव वापरण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. हा वाद हाऊस ऑफ अभिनंदन लोढा, लोढा व्हेंचर्सची रिअल इस्टेट शाखा या नावाशी संबंधित आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्सने याचिकेत ती लोढा समुहाची प्रमुख कंपनी असल्याचा दावा आहे. लोढा समुहातील कंपन्या व्यापारचिन्हाचा वापर करू शकतील, असा करार 2015 पर्यंत होता. 2015 मध्ये, अभिनंदन लोढा हे लोढा समुहापासून वेगळे होतील आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करतील असा निर्णय घेण्यात आला. मार्च 2017 मध्ये आणि नंतर 2023 मध्ये वेगळे होण्याच्या अटी निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार, अभिनंदन यांची कंपनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा नावाने काम करेल, असा निर्णय घेण्यात आला. 2023 मध्ये झालेल्या करारात आपण सहभागी नव्हतो. त्यामुळे, त्यातील अटींना बांधील नसल्याचा दावाही अभिषेक यांच्या मॅक्रोटेक डेव्हेलपर्सने केला आहे.


27 जानेवारीला दोन्ही लोढा बंधूंचा युक्तिवाद ऐकणार-


सुनावणीच्या वेळी एकलपीठाने हा वाद दोन भावांमधील भांडणाशी संबंधित आहे का? अशी विचारणा अभिषेक यांच्या वकिलांकडे केली. त्याला सकारात्मक उत्तर देऊन अभिषेक आणि अभिनंदन यांच्या लोढा या व्यापारचिन्हावरून वाद सुरू असल्याचे अभिषेक यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, एकलपीठाने प्रकरणाची सुनावणी 27 जानेवारी रोजी ठेवताना त्यावेळी अंतरिम दिलासा देण्याच्या मागणीवर युक्तिवाद ऐकण्याचे स्पष्ट केले.


मंगलप्रभात लोढांची संपत्ती किती?


मंगलप्रभात लोढा यांनी एकूण 436 कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. या संपत्तीशिवाय त्यांच्यावर जवळपास 183  कोटींचं कर्ज आहे. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सध्या 436  कोटी 80  लाख 48 हजार 591 रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले.  लोढा यांच्यावर सध्या 182.93 कोटी रुपयांचे तर त्यांची पत्नी मंजुळा लोढा यांच्यावर 123.28  कोटी रुपयांचे कर्ज आहे. लोढा यांच्या नावावर एकूण 123  कोटी 38 लाख 98 हजार 588 रुपये इतकी संपत्ती आहे. तसेच  पत्नीच्या नावावर 10 कोटी 28 लाख 75 हजार 340 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्याकडे 125 कोटी 54 लाख 49 हजार 707 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.




संबंधित बातमी:


Mangalprabhat Lodha: वकील, बिल्डर ते आमदार; आता पुन्हा कॅबिनेट मंत्री, मंगलप्रभात लोढा यांची राजकीय कारकीर्द