सोलापूर: पीक विमा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत भाष्य करताना कोणत्याही योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार होतोच, असे वक्तव्य करुन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वाद निर्माण केला होता. यावरुन टीकेची प्रचंड झोड उठली असतानाच आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सोलापूरातील एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या भाषणातून अवैध वाळू उपसा (Illegal Sand extraction) करणाऱ्यांना एकप्रकारे अभय दिल्याची टीका होत आहे. यामुळे भाजप आणि महायुती सरकारला (Mahayuti Government) पुन्हा एकदा टीकेचा सामना करावा लागणार आहे. टेंभुर्णी येथील सुमन मल्टिप्लेक्सच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात विखे-पाटलांनी केलेला हा 'सेल्फ गोल' महायुती सरकारला महागात पडण्याची शक्यता आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि क्रशर माफियांचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र, राज्यातील एका बड्या मंत्र्याने या सगळ्याचा अभय देणारे वक्तव्य केल्यास वाळू आणि क्रशर माफियांची हिंमत आणखी वाढू शकते, असे बोलले जात आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर, यावरुन बरंच ऐकावं लागतं. सगळी आपलीच माणसं असल्याने मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितले होते . टेंभुर्णी येथे आपल्या भाषणात बोलताना तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रेशरच्या च्या भरपूर गाड्या चालतात असे सांगत जयकुमार तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल असे सांगितले. मी पालकमंत्री असताना अनेक वेळेला याबाबत तक्रारी व्हायच्या, पण मी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना याकडे दुर्लक्ष करण्याचे सांगितले होते. कारण हे घेऊन जाणारे सगळे आपलेच लोक आहेत, असे सांगत वाळू आणि खडीच्या गाड्यांना अभय द्या ,असे सूचक वक्तव्य भाषणात विखे पाटील यांनी केले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातला असून चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना अवस्था झाली आहे. अशावेळी विखे पाटील यांचे वक्तव्य भाजपला अडचणीत आणणारे ठरणार आहे. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याने वाळू माफिया आणि सत्ताधाऱ्यांमध्ये हितसंबंध असल्याचे गुपित उघड झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.


कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून भ्रष्टाचाराचं समर्थन करणारं वक्तव्य


एक रुपयांत पीकविमा या सरकारी योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पीकविम्याची ही योजना बंद होणार का, अशी चर्चा कालपासून रंगली होती. याविषयी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्‍या निदर्शनास आले आहे. प्रकरणात दोन दिवसांपूर्वी काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही योजनेत दोन – पाच टक्के भ्रष्टाचार होतोच. गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत, असे कोकाटे यांनी म्हटले होते. मात्र, कोणत्याही योजनेत दोन – पाच टक्के भ्रष्टाचार होतोच, या त्यांच्या एका वाक्यावरुन विरोधकांनी रान उठवले आहे. माणिकराव कोकाटे यांचं हे वक्तव्य म्हणजे भ्रष्टाचाराचं समर्थन आहे. कृषी खात्याच्या एकूण बजेटच्या दोन-चार टक्के ही रक्कम खूप मोठी होते, असे विरोधकांनी म्हटले होते. 



आणखी वाचा


मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ