Mamata Bannerjee:  कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा (Resigne) देण्याबाबत वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. येथील कोलकाता बलात्कार प्रकरणी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगाल सरकारने आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांना मुख्यंमत्री ममता बॅनर्जी (Mamata bannerjee) यांच्यासमवेत चर्चेचं निमंत्रण दिलं होतं. त्यासाठी, ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांकडेही पोहोचल्या. मात्र, 2 तासांहून अधिक वेळ त्यांनी वाट पाहूनही आंदोलक डॉक्टर त्यांच्यासोबत चर्चेला न आल्यामुळे त्यांनी स्पष्टच शब्दात भूमिका मांडली आहे. तसेच, मी पश्चिम बंगालच्या जनतेची हात जोडून माफी मागते, मी डॉक्टरांना वापस त्यांच्या कामावर रुजू करू शकले नाही, म्हणजेच डॉक्टरांनी (Doctor) आंदोलन मागे घेतलं नाही. त्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी थेट राजीनाम्याची भाषा केली आहे. 


राज्यात सध्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे, त्यामुळे, राज्यातील नागरिकांना वेळेवर उपचार व वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. या आंदोलनामुळे आत्तापर्यंत वेळेत उपचार न मिळाल्याने 27 नागरिकांचा जीवा गेलाय. मात्र, तरीही डॉक्टरांचे आंदोलन सुरूच आहे. मी तीनवेळा प्रयत्न केला, पण डॉक्टरांसोबत चर्चा होऊ शकली नाही. आता, यासंदर्भात जर कुठली बैठक होणार असेल तर ती राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबतच होईल, असेही ममता यांनी स्पष्ट केले. 


काही लोकांना माझी खुर्ची हवी आहे, मला सत्तेची भूक नाही. मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याची भाषा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माझ्यासोबत बैठकीला येण्यासाठी आंदोलक तयार होते. पण, आंदोलकांपैकी एक-दोन जणांना बाहेरुन निर्देश येत होते, त्यामुळे माझ्यासोबत बैठकीला, किंवा चर्चेला ते सहभागी झाले नाहीत. पश्चिम बंगालच्या नागरिकांना वाटत होते, आजतरी या आंदोलनावर तोडगा निघेल. मात्र, मी डॉक्टरांना कामावर परत रुजू करू शकले नाही, त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागते. मी 2 तास वाट पाहिली पण आंदोलक चर्चेला आले नाहीत, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 


मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक का फिस्कटली ?


दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते. आंदोलकांपैकी 15 ज्युनिअर डॉक्टरांचं शिष्टमंडळ बैठकीत चर्चेसाठी येणार होते. मात्र, सरकारकडून ही बैठक लाईव्ह टेलिकास्ट करण्यास प्रतिबंध होता. त्यामुळे, बैठकीसाठी आलेल्या डॉक्टरांनी बाहेरच थांबणं पसंत केलं, ते बैठकस्थळी आले, पण सभागृहात गेले नाहीत. डॉक्टरांकडून ही बैठक लाईव्ह टेलिकास्ट करण्याची मागणी केली जात होती.  विशेष म्हणजे ममता बॅनर्जींनी 2 तास तिथे आंदोलकांची वाट पाहिली होती.  


हेही वाचा


आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'