Malvan Rajkot Fort Dispute: सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळला. याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. राज्यभरात या प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सिंधुदुर्गात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं. त्याचवेळी महाविकास आघाडीतील नेते राजकोट किल्ल्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले. तिथे आधीपासूनच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते. कधीकाळी सहकारी असलेले आणि आता एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि राणे आमने-सामने आले. त्यानंतर राणे समर्थक आणि शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीचं रुपांतर हाणामारीत झालं. 


राजकोट किल्ल्यावर राणे पिता-पुत्र आणि आदित्य ठाकरे दाखल होताच. दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे येताच राणे समर्थकांनी पेंग्विन, पेंग्विन म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते भिडले. राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला. घोषणाबाजी, हाणामारीनंतर पोलिसांनी अधिकची कुमक मागवली. साधारणतः तासभर ठिय्या दिल्यानंतर पोलीस संरक्षणात छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याबाहेर पडले. त्यावेळीही राणे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


ठाकरे विरुद्ध राणे मालवणातील राजकोट किल्ल्यावर तब्बल दीड तास सुरू असलेल्या राड्याचे महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात... 


>> सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्यावर असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीकडून सिंधुदुर्गात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं राजकोट किल्ल्याची पाहाणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे देखील किल्ल्याच्या पाहाणीसाठी दाखल झालेले. 


>> राजकोट किल्ल्याची महाविकास आघाडी आणि महायुतीकडून पाहाणी करण्यात आली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते. राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे येताच राणे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेंग्विन पेंग्विन म्हणत राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर घोषणाबाजीचं रुपांतर थेट राड्यात झालं. दोन्ही गट एकमेकांना भिडले. त्यावेळी नारायण राणे आणि निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. 


>> कधीकाळी सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी आमने-सामने आल्यानंतर हस्तांदोलन केलं. महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थकसुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले. मात्र, ठाकरे आणि राणे आमने-सामने आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. नारायण राणे समर्थक आणि विनायक राऊत समर्थक आमने सामने आल्यानं राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग घडला. हा राडा एका बाजूनं सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेसुद्धा पोहोचले. यावेळी पेंग्विन, पेंग्विन अशा घोषणा देण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य ठाकरे कोणतीही प्रतिक्रिया न देता, किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी निघून गेले. 


>> राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर जाऊन देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. पण आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक किल्ल्यावरील एका पायरीवर ठाण मांडून बसले. यावेळी नितेश राणे आणि त्यांचे समर्थक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत होते. त्यावेळी वैभव नाईक यांनी 15 मिनिटांत आम्हाला रस्ता खाली करुन दिला नाही तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. आम्ही आतमध्ये घुसू, असं म्हटलं. यावर राणे समर्थनक आणखीनच संतापले आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.


>> राड्यावेळी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांशी संवाद साधताना नारायण राणेंचा पार चांगलाच चढल्याचं दिसून आलं. नारायण राणे हे एका ज्येष्ठ राजकीय नेत्यावरून थेट कार्यकर्त्यांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशू राणे म्हणाले, कोणीही मध्ये यायंच नाही. त्यानंतर, पोलसांना बोलतना, साहेब, पोलिसांना जेवढं सहकार्य करायचंय ते करा, यापुढे पोलिसांविरुद्ध आमच्या जिल्ह्यात सहकार्य असेल तर, आणि तुम्ही त्यांना येऊ द्या, परवानगी द्या, आमच्या अंगावर घाला, घरात खेचून रात्रभर एकेकाला मारून टाकेन, सोडणार नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घटनास्थळी इशारा दिल्याचे पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी एबीपी माझाच्या रिपोर्टरशी देखील अरेरावी केली. 


>> मालवणीमधील राजकोट किल्ल्यावर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यावेळी नारायण राणे, निलेश राणे उपस्थित होते. यासंदर्भातलं वार्तांकन करण्यासाठी एबीपी माझाचे रिपोर्टर घटनास्थळी हजर होते. त्यावेळी नारायण राणे पोलिसांसोबत बोलत होते. त्याचवेळी एबीपी माझाचा माईक नारायण राणेंनी पाहिला आणि आक्रमकपणे त्यांनी तो माईक ओढण्याचा प्रयत्न केला आणि रिपोर्टरसोबत दमदाटी केली. 


>> ठाकरे आणि राणे समर्थकांच्या वादात जयंत पाटलांकडून मध्यस्थी करण्यात आली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शांतता राखण्याचं आवाहन करताना दिसले, दोन्हीकडच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची जयंत पाटलांनी समजूत काढली. त्यानंतर नारायण राणे आणि निलेश राणेंचीही समजूत काढण्याचं काम त्यांनी केलं. तसेच, वाद मिटवण्याचं सातत्यानं ते आवाहन करत होते. 


>> राड्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, "स्टॅच्यु ऑफ लिबर्टी असेल, छत्रपती शिवरायांचा गेट वे ऑफ इंडियाचा पुतळा आगे. हे सगळं होत असताना इथे भाजपवाल्यांनी चोरी करुन हे सगळं लावलं आहे. तो 24 वर्षांचा मुलगा आहे कुठे? त्याला कंत्राट दिलं कोणी होतं? तो फरार आहे, त्याला पळून जायला मदत केली का? जसं भाजपवाल्यांनी रेवन्नाला पळून जायला मदत केली होती. तशीच यालाही केली का? ही सर्व उत्तरं मिळाली पाहिजे, तसेच, जे मंत्री आहेत, पीड्ब्यूडीएफचे त्यांच्यावर यासाठी एफआयआर झालंय का?"


>> "मला वाटतं हे दुर्दैवी आहे. हा बालिशपणा आहे. आम्ही येत असताना कुठल्यातरी एका कॅमेरामनला धक्काबुक्की झाली आणि त्यापासून हा सर्व प्रकार सुरू झाला. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. अशा महाराजांच्या किल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही. म्हणूनच मी इथे सगळ्यांना अडवून धरलं आहे. या बालिशपणात मला पडायचं नाही. त्यांची बुद्धी तेवढीच आहे. बालबुद्धी तेवढी राहते, उंचीप्रमाणे बुद्धी आहे.", अशी प्रतिक्रियाही आदित्य ठाकरेंनी दिली. 


>> किल्ल्यावर पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाला शांत केलं आहे. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते काहीसे शांत झाल्याचं पाहायला मिळालं. घोषणाबाजी, हाणामारीनंतर पोलिसांनी अधिकची कुमक मागवली. साधारणतः तासभर ठिय्या दिल्यानंतर पोलीस संरक्षणात छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याबाहेर पडले. त्यावेळीही राणे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


ठाकरे-राणे राड्यावेळी नेमकं काय घडलं? 


मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आज राणे समर्थक आणि ठाकरे गटाचा अभूतपूर्व राडा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने मालवणमध्ये मोर्चाची हाक दिली होती.मोर्चाआधी आदित्य ठाकरे, वडेट्टीवार, जयंत पाटील हे किल्ल्यात पाहणीसाठी आले. मात्र आदित्य ठाकरे किल्ल्यात दाखल होण्याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे किल्ल्यात शेकडो कार्यकर्त्यांसह दाखल झाले. किल्ल्याची पाहणी केल्यावर राणे पितापुत्र किल्ल्याच्या पुढील दरवाजाकडे आले असतानाच आदित्य ठाकरे आले. आदित्य ठाकरे मुख्य पुतळ्याच्या घटनास्थळी पाहणी करत असतानाच खाली ठाकरे गट आणि राणे समर्थकांच्या जोरदार घोषणा सुरू झाल्या. बघताबघता या घोषणाबाजीने धक्काबुक्कीचं स्वरूप घेतलं. दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली. दरम्यान नारायण राणेंना प्रश्न विचारण्याच्या प्रयत्न करणारे माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनाही राणेंनी दमदाटी केली. राणेंनी माझाचा बुम माईक ढकलून दिला... दरम्यान जयंत पाटील यांनी वारंवार दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्याशी ते वारंवार संवाद साधत होते. कार्यकर्त्यांनी आपापसातल्या धक्काबुक्कीत किल्ल्याच्या भिंतीवर लावलेले चिरेहील खाली पाडले. मागील दाराने ठाकरे गटाने जाण्याची मागणी राणे समर्थकांनी लावून धरली. मात्र दोन्ही गट पुढील दरवाजानेच बाहेर जाण्यावर ठाम होते. अखेर दीड वाजताच्या सुमारास आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांच्या गराड्यात जोरदार घोषणाबाजी करत किल्ल्यातून पुढच्या दाराने बाहेर पडले. 


पाहा व्हिडीओ :  Malvan Rajkot Rada : धक्काबुक्की, दमदाटी, पेंग्विन ते कोंबडी चोर;राजकोट गडावर राडा, नेमकं काय घडलं?



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं? राणे -ठाकरेंच्या राड्याची A टू Z कहाणी!