मुंबई: भाजपशी दगाफटका करणाऱ्या पक्षांना दंडित करा, असा आदेश अमित शाह यांनी दिला होता. त्यानुसार आमच्याशी दगाबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आम्ही दंडित केले, असे वक्तव्य करणारे भाजप नेते आशिष शेलार यांना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले. मला आशिष शेलारांच्या (Ashish Shelar) कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. कारण मला मनापासून त्यांच्याविषयी वाईट वाटते. मी त्यांना सांगितलं की, त्यांना थेरपीची गरज आहे. आशिष शेलारांना पक्षात कोणी भाव देत नाही. त्यांना मंत्रिपद दिलं जात नाही, त्यांचे जॅकेट तयार आहे. त्यामुळे मला आशिष शेलार यांच्याविषयी सहानुभूतीपलीकडे काहीही वाटत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत एबीपी माझा आयोजित 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलत होते.
प्रदुषणकारी उद्योग महाराष्ट्राला, रोजगारनिर्मिती करणारे उद्योग गुजरातच्या वाट्याला: आदित्य ठाकरे
यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या उद्योगविषयक धोरणांवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना असूनही महाराष्ट्रात मोठी परकीय गुंतवणूक आली होती. पण भाजपने महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाची राखरांगोळी केली आहे. जे उद्योग आपल्याला नको आहेत, ज्यांची अंमलबजावणी करणे अवघड आहे, ते प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारले जात आहेत. यामध्ये जैतापूर आणि नाणारसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. तर सेमीकंडक्टर, एअरबस, बल्क ड्रग प्रकल्प यासारखे स्वच्छ आणि मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण करणारे उद्योग गुजरातला पाठवले जात आहेत. महाराष्ट्र कसा चालवायचा, हे दिल्लीतून आलेल्या आदेशांवर ठरत आहे. इगो इश्यू म्हणून महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला पाठवले जात आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
ज्या व्यक्तीने स्वत:ला विकलं तो उद्या भाजपचाही होणार नाही: आदित्य ठाकरे
या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असताना हे सगळं षडयंत्र रचण्यात आले. ज्या व्यक्तीने स्वत:ला विकलं ते उद्या भाजपचेही होणार नाही, हेच लोक उद्या भाजपच्या लोकांची पदं मिळवायच्या मागे लागतील. पण आम्ही या गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी बघून देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'ला राजकीय नेत्यांची मांदियाळी
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2024) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधण्यात आला. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे, एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती.
आणखी वाचा